मुंबई : महाराष्ट्रातील गोरगरीब जनतेसाठी महायुती सरकारने घेतलेल्या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे रमाई आवास योजनेंतर्गत मिळणाऱ्या अनुदानात लक्षणीय वाढ झाली आहे. या निर्णयामुळे ग्रामीण भागातील गरीब कुटुंबांना स्वतःचे घर बांधणे आता सुलभ होणार आहे.
आमदार अमित गोरखे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आले असून, त्यांनी महाराष्ट्रभर केलेल्या बहुजन संवाद यात्रेदरम्यान गोळा केलेल्या माहितीच्या आधारे हा निर्णय घेण्यात आला आहे. ग्रामीण भागातील मागासवर्गीय जनतेच्या मागणीला प्रतिसाद देत महायुती सरकारने हे पाऊल उचलले आहे.
या निर्णयानुसार, रमाई आवास योजनेंतर्गत ग्रामीण भागातील लाभार्थ्यांना आता घर बांधण्यासाठी २ लाख ५० हजार रुपये मिळणार आहेत. यापूर्वी ही रक्कम केवळ १ लाख २० हजार रुपये होती. याशिवाय, शौचालय बांधकामासाठी १२,००० रुपयांचे अतिरिक्त अनुदान देण्यात येणार आहे.
आमदार अमित गोरखे यांनी या निर्णयाबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचे आभार मानले आहेत. ते म्हणाले, "या निर्णयामुळे ग्रामीण भागातील गरीब कुटुंबे आता चांगल्या दर्जाचे घर बांधू शकतील. संपूर्ण महाराष्ट्रातून या निर्णयाचे स्वागत होत आहे."
गोरखे यांनी पुढे सांगितले की, "महायुती सरकार मागासवर्गीय, कष्टकरी आणि गरीब जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी कटिबद्ध आहे. या निर्णयामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत जनता नक्कीच महायुती सरकारच्या पाठीशी उभी राहील."
या निर्णयामुळे महाराष्ट्रातील गरीब कुटुंबांना स्वतःचे घर बांधण्याचे स्वप्न साकार करण्यास मदत होणार असून, ग्रामीण भागातील जीवनमान सुधारण्यास हातभार लागेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
Reviewed by ANN news network
on
१०/०५/२०२४ ०५:३४:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: