पिंपरी : चिंचवड विधानसभा मतदारसंघातील नागरिकांसाठी पायाभूत सुविधांच्या विकासासाठी सातत्याने प्रयत्नशील असलेले माजी नगरसेवक राहुल कलाटे यांच्या अथक परिश्रमांना अखेर यश आले आहे. त्यांच्या निरंतर पाठपुराव्यामुळे महापालिका प्रशासनाने वाकड, ताथवडे आणि पुनावळे परिसरातील अनेक महत्त्वाच्या विकास आराखडा (डीपी) रस्त्यांना मंजुरी दिली आहे.
महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी या रस्त्यांच्या विकासाला हिरवा कंदील दाखवला आहे. या निर्णयामुळे सदर भागातील वाहतूक कोंडीची समस्या मोठ्या प्रमाणात सुटणार असून, पीएमआरडीए क्षेत्रातील मावळ, मुळशी, हिंजवडी आयटी पार्क आणि पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागांशी संपर्क सुलभ होणार आहे. स्थानिक रहिवासी व आयटी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.
नव्याने मंजूर झालेल्या रस्त्यांमध्ये मुंबई-बंगळुरू महामार्गापासून काटे वस्तीपर्यंतचा ३० मीटर रुंद व २ किलोमीटर लांबीचा रस्ता, कोयते वस्ती चौक ते जांबेगाव येथील १८ मीटर रुंद व १.२५ किलोमीटर लांबीचा रस्ता, तसेच मधुबन हॉटेल ते इंदिरा कॉलेजपर्यंतचा २४ मीटर रुंद व २.५० किलोमीटर लांबीचा रस्ता यांचा समावेश आहे.
राहुल कलाटे यांनी या संदर्भात प्रतिक्रिया देताना सांगितले की, "गेल्या दोन वर्षांपासून या भागातील रस्त्यांच्या विकासासाठी मी सातत्याने प्रयत्नशील होतो. विविध विभागांशी निरंतर पत्रव्यवहार आणि आक्रमक पाठपुरावा केल्यामुळेच हे शक्य झाले आहे."
या रस्त्यांच्या विकासामुळे नागरिकांचा प्रवास सुखकर होणार असून, प्रदूषण कमी होण्यास मदत होईल. तसेच इंधन व वेळेची बचत होऊन दैनंदिन वाहतुकीतील त्रास कमी होईल. सुरक्षित पदपथ आणि पावसाळी पाण्याच्या निचऱ्याची व्यवस्था या रस्त्यांवर केली जाणार आहे.
तथापि, काही रस्त्यांच्या कामांना न्यायालयीन प्रक्रियेमुळे विलंब होण्याची शक्यता आहे. मात्र, बहुतांश रस्त्यांच्या कामांना लवकरच सुरुवात होणार असल्याचे कलाटे यांनी स्पष्ट केले आहे.
Reviewed by ANN news network
on
१०/०५/२०२४ ०५:३१:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: