पुणे: पुणे महानगरपालिकेच्या जन्म-मृत्यू नोंदणी कार्यालयाकडून जन्म आणि मृत्यूचे दाखले वितरित करण्यात सध्या विलंब होत असल्याची माहिती समोर आली आहे. हा विलंब केंद्र सरकारने विकसित केलेल्या सुधारित सीआरएस (नागरी नोंदणी प्रणाली) संगणक प्रणालीतील तांत्रिक अडचणींमुळे होत असल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे.
१ मार्च २०१९ पासून पुणे महापालिकेच्या १५ क्षेत्रीय कार्यालयांमध्ये सीआरएस प्रणालीद्वारे जन्म-मृत्यू नोंदणीचे काम सुरू झाले. २४ जून २०२४ पासून या प्रणालीत सुधारणा करण्यात आली. मात्र या सुधारित प्रणालीत अनेक तांत्रिक अडचणी येत असून, त्यामुळे दाखले वितरणास विलंब होत आहे.
पालिकेच्या आरोग्य विभागाकडून या समस्येबाबत जिल्हा निबंधक, उपसंचालक आणि केंद्र सरकारच्या संबंधित विभागाकडे वारंवार पाठपुरावा करण्यात येत आहे. तसेच नागरिकांना विहित वेळेत दाखले मिळावेत यासाठी पालिकेकडून प्रयत्न सुरू असल्याचेही सांगण्यात आले आहे.
या परिस्थितीत नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन पुणे महानगरपालिकेचे निबंधक तथा आरोग्य अधिकारी डॉ. नीना बोराडे यांनी केले आहे. तसेच सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ. मनीषा नाईक यांनीही नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.
सध्या जन्म-मृत्यूचे दाखले केवळ संबंधित क्षेत्रीय कार्यालयातील उपनिबंधक तथा क्षेत्रीय वैद्यकीय अधिकारी यांच्याकडूनच वितरित केले जात आहेत. पालिका प्रशासन या समस्येवर तोडगा काढण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
Reviewed by ANN news network
on
१०/११/२०२४ १०:३२:०० AM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: