पिंपरी : महाराष्ट्रातील युवकांना शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण मिळून नोकरीची क्षमता वाढवण्यासाठी महाराष्ट्र शासनाने "मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना" सुरू केली आहे. २०२४-२५ या आर्थिक वर्षापासून ही योजना कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग आणि मुख्यमंत्री जन-कल्याण कक्षाच्या संयुक्त विद्यमाने राबवली जात आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी महाराष्ट्रातील युवकांनी तसेच विविध क्षेत्रातील आस्थापनांनी पुढे यावे, असे आवाहन तंत्र शिक्षण संचालक डॉ. विनोद मोहीतकर यांनी केले आहे.
या योजनेतून https://rojgar.mahaswayam.gov.in/ या संकेतस्थळावर रोजगार इच्छुक उमेदवार आणि रोजगार देणाऱ्या कंपन्यांची नोंदणी केली जाणार आहे. उमेदवारांना प्रशिक्षणाद्वारे प्रत्यक्ष कामाचा अनुभव मिळेल, तर उद्योजकांना त्यांच्या उद्योगांसाठी आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध होईल.
योजनेचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे उमेदवारांना उद्योगांमध्ये प्रत्यक्ष कार्य प्रशिक्षणाद्वारे रोजगारक्षम बनवणे. बारावी, आयटीआय, पदविका, पदवी आणि पदव्युत्तर शैक्षणिक पात्रता असलेले रोजगार इच्छुक आणि उद्योजक यासाठी अर्ज करू शकतात. प्रशिक्षणाचा कालावधी सहा महिने असेल.
उमेदवार पात्रता:
- किमान वय १८ आणि कमाल वय ३५ वर्षे
- किमान शैक्षणिक पात्रता: बारावी पास / आयटीआय / पदविका / पदवी / पदव्युत्तर
- महाराष्ट्राचा रहिवासी असणे अनिवार्य
- आधार नोंदणी आणि आधार संलग्न बँक खाते असणे आवश्यक
उद्योग पात्रता:
- महाराष्ट्र राज्यात किमान तीन वर्षांपूर्वी स्थापन झालेले उद्योग
- किमान २० कर्मचारी असणे आवश्यक
- उद्योगांनी EPF, ESI, CST, DPIIT आणि उद्योग आधार नोंदणी केलेली असणे आवश्यक
शैक्षणिक पात्रतेनुसार उमेदवारांना सहा हजार, आठ हजार, दहा हजार रुपये मासिक स्टायपेंड दिले जाणार आहे. या योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी सात सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: