पिंपरी : टाटा उद्योग समूहाचे सर्वेसर्वा आणि भारतीय उद्योगजगतातील दिग्गज व्यक्तिमत्व पद्मविभूषण रतन टाटा यांच्या निधनाने पिंपरी चिंचवड औद्योगिक नगरीने आपला विकासाचा महामेरू गमावला असल्याचे मत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांनी व्यक्त केले.
रतन टाटा यांचे बुधवार, ९ ऑक्टोबर २०२४ रोजी निधन झाले. त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी पिंपरी येथील महानगरपालिकेच्या मुख्य प्रशासकीय भवनात एक विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात आयुक्त शेखर सिंह यांनी रतन टाटा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना श्रद्धांजली वाहिली.
आयुक्त सिंह म्हणाले, "संपूर्ण जगासमोर आदर्श निर्माण करणारे, उद्योगविश्वात समाजभान जपणारे, दानशूर आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्व असलेले रतन टाटा यांनी देशाला अग्रेसर ठेवण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली. पिंपरी चिंचवडला औद्योगिक नगरी म्हणून ओळख निर्माण करून देण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता."
या कार्यक्रमास अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, विजयकुमार खोराटे, चंद्रकांत इंदलकर यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
रतन टाटा यांच्या योगदानाबद्दल बोलताना आयुक्त सिंह यांनी पुढे सांगितले की, "भारताचा ठसा जागतिक पातळीवर उमटविण्यात रतन टाटा यांचे मोलाचे योगदान आहे. पिंपरी चिंचवड शहराला 'औद्योगिक नगरी' हे नाव सार्थ ठरविण्यातही टाटा उद्योग समूहाचा महत्त्वपूर्ण वाटा आहे. अनेक लघुउद्योग या शहरात सुरू होऊन बेरोजगार तरुणांना रोजगार उपलब्ध झाला आणि अनेकांचे जीवनमान उंचावले."
त्यांनी रतन टाटा यांच्या व्यक्तिमत्त्वाचे वर्णन करताना त्यांच्यातील परोपकारी वृत्ती, सामाजिक बांधिलकी, सचोटी, जिद्द, नैतिकता, उद्यमशीलता, संयम, साधेपणा आणि नम्रता यांचा उल्लेख केला. कोविड-१९ च्या संकटकाळात रतन टाटा यांनी पिंपरी चिंचवड महापालिकेला केलेल्या मदतीचेही त्यांनी स्मरण केले.
रतन टाटा यांच्या निधनामुळे महापालिकेने आजचे सर्व नियोजित कार्यक्रम रद्द केले आहेत. तसेच, महापालिका वर्धापन दिनानिमित्त आयोजित करण्यात येणाऱ्या विविध स्पर्धाही रद्द करण्यात आल्या आहेत. शासकीय दुखवटा जाहीर झाल्याने महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय भवनावरील आणि निगडी येथील भक्ती-शक्ती चौकातील राष्ट्रध्वज अर्ध्यावर फडकवण्यात आला आहे.
उद्योगविश्वातील या लखलखत्या ताऱ्याच्या निधनाने सर्व स्तरांतून खंत व्यक्त केली जात असून, पिंपरी चिंचवड शहर त्यांच्या स्मृतीस मानवंदना देत आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: