मुंबई : कल्याण पोलिसांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बनवणारा शिल्पकार जयदीप आपटे याला अखेर ताब्यात घेतले आहे. शिवरायांच्या पुतळ्याच्या कोसळल्याच्या घटनेनंतर दोन आठवड्यांपासून तो फरार होता. पोलीसांनी शक्कल लढवत त्याला अटक केली असून, पुढील न्यायालयीन कारवाईसाठी त्याला हजर करण्यात येणार आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथील राजकोट किल्ल्यावर उभारलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा 26 ऑगस्टला अचानक कोसळला. या घटनेमुळे महाराष्ट्रभर संतापाची लाट उसळली होती. पुतळा उभारणाऱ्या जयदीप आपटेवर या घटनेची जबाबदारी टाकण्यात आली होती, आणि त्यानंतर तो फरार झाला होता. सिंधुदुर्ग पोलिसांनी त्वरित तपास सुरू करून जयदीप आपटे याच्या मागावर होते.
26 ऑगस्ट रोजी शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर जयदीप आपटे हा त्याच्या राहत्या घरातून फरार झाला होता. पोलिसांना संशय होता की तो कल्याण परिसरात लपलेला आहे. कल्याण पोलिस उपायुक्त सचिन गुंजाळ यांच्या नेतृत्वाखालील टीमने जयदीप आपटेच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवले. जयदीपची पत्नी आणि कुटुंबीय त्याला आत्मसमर्पण करण्यास समजावत होते. अखेर, जयदीपने आपल्या पत्नीला घरी येण्याबाबत माहिती दिली आणि ही माहिती मिळताच त्याच्या पत्नीने पोलिसांना कळवले.
जयदीप आपटेचा माग काढण्यासाठी पाच ते सात पोलीस पथकं कार्यरत होती. रात्रीच्या सुमारास जयदीप कल्याण स्थानकात उतरून त्याच्या घराकडे निघाला होता. त्याने टोपी आणि मास्क घालून आपली ओळख लपवण्याचा प्रयत्न केला, परंतु पोलिसांनी त्याला ओळखले आणि त्याच्या आयडी कार्डची तपासणी केली. संशयास्पद वागणुकीमुळे पोलिसांनी त्याला थांबवून विचारणा केली, तेव्हा तो घाबरून पोलीसांसमोर रडायला लागला. अखेर पोलिसांनी त्याला शांत करून अटक केली.
शिवरायांच्या पुतळ्याच्या कोसळल्याच्या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रात संताप व्यक्त केला जात आहे. स्थानिक नागरिक आणि विविध संघटनांनी या प्रकरणात कठोर कारवाईची मागणी केली होती. जयदीप आपटेच्या अटकेनंतर शिवभक्तांनी दिलासा व्यक्त केला आहे, परंतु या घटनेमुळे होणारी न्याय प्रक्रिया आणि पुतळ्याची दुरुस्ती यावर पुढील लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे.
शिवरायांच्या पुतळ्याच्या कोसळल्याच्या घटनेनंतर शिल्पकार जयदीप आपटेच्या अटकेने या प्रकरणात एक महत्त्वाचा टप्पा पार पडला आहे. पोलीस आता पुढील तपास करून या घटनेतील दोषींची संपूर्ण चौकशी करतील आणि न्याय मिळवून देतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: