पुणे: राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या हत्या प्रकरणात पुणे पोलिसांनी आंदेकर यांच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून वनराज यांच्या दोन सख्ख्या बहिणींसह दोन मेहुण्यांना अटक केली आहे.
पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींमध्ये वनराज आंदेकर यांच्या बहिणी संजीवनी कोमकर आणि कल्याणी कोमकर यांच्यासह त्यांचे मेहुणे जयंत कोमकर आणि गणेश कोमकर यांचा समावेश आहे. रविवारी रात्री नानापेठ येथील डोके तालीम परिसरात झालेल्या हल्ल्यात आंदेकर यांच्यावर गोळीबार करून त्यांच्यावर कोयत्याने वार करण्यात आले होते, ज्यात त्यांचा मृत्यू झाला.
पोलिस या हल्ल्याचा तपास करत असताना असे समोर आले की आरोपींचा आकाश परदेशी नावाच्या व्यक्तीसोबत काही कारणांवरून वाद झाला होता. हा वाद मिटवण्यासाठी आरोपी पोलीस ठाण्यात गेले असता, वनराज आंदेकर आणि त्यांच्या भावाने पोलीस ठाण्यात मध्यस्थी केली होती. या भांडणानंतर संजीवनी कोमकर हिने "आम्ही तुला जगू देणार नाही." अशी वनराज यांना धमकी दिली होती, त्यानंतरच हा हल्ला झाला.
रविवारी झालेल्या हल्ल्याचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. ज्यात 12 हल्लेखोर चार ते पाच गाड्यांवर घटनास्थळी आले होते. त्यांनी घटनास्थळावर उतरून गोळीबार केला, आणि वनराज आंदेकर गंभीर जखमी झाल्यानंतर घटनास्थळावरून फरार झाले.
या प्रकरणाचा पुढील तपास पुणे पोलीस करत आहेत. पोलिसांनी आतापर्यंत या प्रकरणात 10 ते 12 आरोपींची ओळख पटवून काही जणांना अटक केली आहे. या प्रकरणात अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत, ज्यांची उत्तरे पोलिसांना शोधावी लागतील.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: