पुणे: राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांची हत्या त्यांच्या सख्ख्या बहिणीनेच कट रचून केली असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. रविवारी रात्री नानापेठ परिसरात दहा ते बारा तरुणांनी पिस्तुलातून गोळ्या झाडून आणि कोयत्याने वार करून वनराज आंदेकर यांचा खून केला. या हत्येमागे त्यांची सख्खी बहिण संजीवनी जयंत कोमकर आणि मेव्हणा जयंत लक्ष्मण कोमकर असल्याचे उघड झाले आहे. या घटनेने पुण्यातील गुन्हेगारी व राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
आरोप आहे की, एका वादामध्ये मध्यस्थी केल्याच्या रागातून संजीवनीने वनराज आंदेकर यांना धमकी दिली होती, "तुला पोरं बोलवून ठोकतेच," आणि नंतर त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. हल्ल्यानंतर वनराज आंदेकर गंभीर जखमी झाले होते आणि त्यांचा मृत्यू झाला.
याप्रकरणी संजीवनी जयंत कोमकर, जयंत लक्ष्मण कोमकर, प्रकाश जयंत कोमकर, गणेश लक्ष्मण कोमकर, सोमनाथ सयाजी गायकवाड, अनिकेत दूधभाते, तुषार उर्फ आबा कदम, सागर पवार, पवन करताल, सॅम ऊर्फ समीर काळे यांच्यासह आणखी पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वनराज यांचे वडील सूर्यकांत ऊर्फ बंडू राणूजी आंदेकर यांनी या प्रकरणी पोलिसात फिर्याद दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वनराज आंदेकर यांची बहिण संजीवनी कोमकर आणि तिचा पती जयंत कोमकर यांच्या दुकानावर अतिक्रमण विभागाने कारवाई केली होती, ज्यामागे वनराज यांचा हात असल्याचा संजीवनीला संशय होता. या कारणावरून बहिणीने रागाच्या भरात आपल्या भावाच्या जीवावर उठण्याचा निर्णय घेतला. संजीवनी आणि जयंत यांनी कट रचून, वनराज यांचा खून घडवला असल्याचे आरोप करण्यात आले आहेत.
या घटनेने पुण्यातील डोके तालिम परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास सुरू केला आहे. .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: