देशवासीयांना ७६ व्या १७ सप्टेंबर मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या निमित्ताने मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा...
१७ सप्टेंबर मराठवाडा मुक्ती संग्राम ...
आपला मराठवाडा ७६ वर्षा पुर्वी १७ सप्टेंबर १९४८ रोजी सातशे वर्षांच्या प्रदिर्घ अशा निजामाच्या राजवटीची काळरात्र संपवून मराठवाड्याला स्वातंत्र्य मिळाले . अनेक शूरवीर स्वातंत्र्य सैनिकांनी प्राणांची आहुती दिली, जुलमी निजामाविरूद्ध संपूर्ण मराठवाडा संघर्ष करत लढला आणि स्वातंत्र्याच्या इतिहासात मराठवाडा मुक्ती संग्राम घडला.
आपला भारत देश १५ ऑगस्ट १९४७ रोजी ब्रिटीशांच्या राजवटीतून स्वतंत्र झाला.आपल्या देशात स्वातंत्र्याचा जयघोष चालू झाला पण त्याच वेळी मराठवाडा जुलमी निजामाच्या राजवटीत रझाकारांचे अनन्य अत्याचार भोगत होता . मराठवाडा रझाकारांच्या निजामाच्या तावडीतुन मुक्त करण्यासाठी तरुण, वयस्कर माणसांसह स्त्रियाही स्वातंत्र्यासाठी प्राणपणानं लढत होत्या. मराठवाडा मुक्ती लढ्यात निजामाची राजवट संपविण्यासाठी स्वातंत्र्य सैनिकांनी मराठवाड्यातील जवळपास २५० गावातील शासन व्यवस्था निकामी केली होतीे. मराठवाडा मुक्ती संग्रामातील नेते स्वामी रामानंद तीर्थ, स्वातंत्र्यसेनानी स्व . गोविंदभाई श्रॉफ व भारत देशाचे तत्कालीन गृहमंत्री लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुढाकाराने पोलीस ॲक्शन १०० तासात संपवली होती . मराठवाडा स्वतंत्र होऊन भारत देशात विलीन झाला.मराठवाडा स्वतंत्र करण्यासाठी हजारो संसार उद्धवस्त झाले होते,गावची गावे संपली होती,सर्वत्र रक्तबंबाळ मराठवाडा झाला होता . मराठवाड्यातील स्वातंत्र्य सैनिक कधी शस्त्र घेऊन लढले तर कधी निशस्त्र लढले. मराठवाड्यातील शूरवीर स्वातंत्र्य सैनिकांच्या त्याग व बलिदानामुळे मराठवाडा १७ सप्टेंबर १९४८ रोजी स्वतंत्र झाला .
आपला भारत देश जगाच्या नकाशात अनेक यशाचे शिखर चढत आहे अनेक नवनवीन संशोधन होत आहे,पण मराठवाड्याला अपेक्षित असा विकास आतापर्यंत झाला नाही,मराठवाड्यात निसर्गाच्या लहरीेपणामुळे कधी ओला दुष्काळ तर कधी कोरडा दुष्काळ यांना सामोरे जावे लागते.आपण जर मराठवाड्याकडे पाहीले तर आज ही तेच चित्र दिसते. उन्हाळ्यात भेगा पडलेली जमीन, हंडाभर पाण्यासाठी करावी लागणारी वणवण, पाण्याविना जनावरांचे होणारे हाल,पाणी नसल्यामुळे आटलेले नदी नाले आणि गावाकडे रखडलेले रस्ते , उजाड माळरान,औद्योगिक क्षेत्रात रिकाम्या पडलेल्या जमीनी, बेरोजगार तरुणाई, कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या करणारा शेतकरी .
मी विदर्भातील भूमिपुत्र जरी असलो तरी माझं आजोळ हे नांदेड असल्याने मराठवाड्यासाठी आपलं काही देणं लागते म्हणून माझे परमस्नेही श्री नितीन चिलवंत यांच्या सोबत गेल्या अनेक वर्षांपासून कार्यरत आहे. आपण आपल्या मराठवाड्याचा बदल घडवू शकतो.मराठवाड्यातील अनेक भूमिपुत्रांनी स्वत:च्या कर्तृत्वाने समाजात विविध क्षेत्रात नाव कमविले आहे.अशा विविध क्षेत्रातील यशस्वी व्यक्तीमत्वांना एकत्र आणून आपल्या जन्मभूमिच्या विकासाची मोट बांधण्याचे काम ही सातत्याने सुरूच आहे.
१७ सप्टेंबर मराठवाडा मुक्ती संग्राम दिन मराठवाड्यापुरता मर्यादित न राहता तो संपूर्ण देशात साजरा करण्यात यावा यासाठी ज्या भूमिपुत्रानी आपल्या बुद्धीचातुर्याच्या लेखणीतून विविध प्रशासकीय विभाग,विविध मंत्रिमहोदय यांना पत्रव्यवहार करून केंद्राला तसे राजपत्रित आदेश काढायला भाग पाडले तसेच पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने या कार्यक्रमासाठी दहा लाख रुपयांची मंजुरी मिळवून देण्यासाठी आपली नोकरी, कुटुंबासाठी असलेला अनमोल वेळ खर्चून,सामाजिक बांधिलकी सांभाळून रात्रीचा दिवस करत जे योगदान दिले ते अतुलनीय आहे कारण त्याचा मी स्वतः साक्षीदार आहे.
पिंपरी चिंचवड महानगरातील ते त्यांच्या कार्यकर्तृत्वाने महाराष्ट्र शासनाच्या १७ सप्टेंबर मराठवाडा मुक्ती संग्राम स्वातंत्र्य दिनाच्या समितीवर सदस्य विराजमान झाले आहेत. तसा राजपत्रित आदेश ही झालेला आहे.
एवढं लिखाण करण्याचं कारण की कार्यक्रमाची ही पत्रिका बघितल्यावर मला माझ्या नितीन चिलवंत या मित्राचं नाव कुठल्या एका कोपऱ्यात सुद्धा बघायला मिळालं नाही याचं मला आश्चर्य वाटते आणि जे या सर्व प्रक्रियेत एकदाही मला दिसले नाहीत अशांची नावे या समितीत दिसत आहेत.ही खूप मोठी शोकांतिका आहे.
असो; मराठवाडा स्वतंत्र करण्यासाठी ज्या स्वातंत्र्य सैनिकांनी प्राणांची आहुती देऊन आपल्या येणाऱ्या पिढीसाठी सुवर्णकाळ निर्माण केला.शौर्य,पराक्रमाने स्वत:चा इतिहास मराठवाड्याच्या मातृभूमीत सुवर्णअक्षरांनी लिहीला त्या वीरांना मानाचा मुजरा !
- शिवकुमारसिंह र.बायस
Reviewed by ANN news network
on
९/१६/२०२४ ०९:२६:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: