चिंचवड: आगामी विधानसभेच्या निवडणुकीत चिंचवड मतदारसंघात भाजपचा उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी होईल, असा आत्मविश्वास व्यक्त करत, भाजपच्या राष्ट्रीय सचिव तथा आमदार पंकजा मुंडे यांनी कार्यकर्त्यांना निवडणूक लढविण्यासाठी सज्ज होण्याचे आवाहन केले आहे. दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या विकासाचा वारसा पुढे नेण्यासाठी भाजपचा प्रत्येक कार्यकर्ता बांधील आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
पुण्यातील विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी पंकजा मुंडे यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. मंगळवारी त्यांनी चिंचवड येथे भाजपच्या पदाधिकारी, कार्यकर्ते आणि माजी नगरसेवक यांच्यासोबत बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी चिंचवड मतदारसंघात एक लाखांहून अधिक मताधिक्याने विजय मिळवण्याचा निर्धार व्यक्त केला.
मुंडे म्हणाल्या, "लक्ष्मणभाऊंनी गेल्या २० वर्षांत चिंचवडचा विकास साधला आहे. त्यांचा हा वारसा पुढे नेण्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्याने आपली जबाबदारी ओळखून आजपासूनच कामाला लागावे. या निवडणुकीत मोठे यश मिळवून दाखवू."
बैठकीला भाजपा प्रदेश उपाध्यक्ष अमर साबळे, भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप, आमदार आश्विनी जगताप, तसेच अनेक माजी नगरसेवक आणि कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. या वेळी शंकर जगताप यांनी सांगितले की, "केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनांचा लाभ नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचे काम भाजपाने गेल्या वर्षभरात प्रभावीपणे केले आहे. त्यामुळेच चिंचवड मतदारसंघातील जनतेचा विश्वास भाजपावर वाढला असून, आगामी निवडणुकीत भाजपाचा झेंडा मोठ्या मताधिक्याने फडकवणार आहे."

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: