पिंपरी-चिंचवड सायबर सेलची मोठी कामगिरी
पिंपरी चिंचवड: शेअर मार्केट ट्रेडिंगच्या नावाखाली ऑनलाईन ५० लाख ७० हजार रुपयांची फसवणूक करणाऱ्या तीन आरोपींना पिंपरी-चिंचवड सायबर सेलने अटक केली आहे. दौंड, श्रीगोंदा आणि मांजरी येथे तांत्रिक तपासाच्या आधारे या आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.
अमर त्र्यंबक फराटे (वय ३८), रा. दौंड, संतोष पाचपुते (वय ३५) रा. श्रीगोंदा आणि शैलेश क्षीरसागर (वय ३७) रा. मांजरी अशी आरोपींची नावे आहेत.
दिघी येथे राहणाऱ्या तक्रारदार यांना फेसबुकवर टीआरपीएच कंपनीची जाहिरात दाखवण्यात आली होती. त्यानंतर आरोपींनी तक्रारदारांना व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामील करून कंपनीच्या अॅपवर शेअर ट्रेडिंग करण्यासाठी प्रलोभन दाखविले. आरोपींनी चांगला नफा मिळवून देण्याचे आश्वासन दिल्यानंतर तक्रारदाराने त्यांच्या मार्गदर्शनानुसार वेगवेगळ्या बँक खात्यांवर ५० लाख ७० हजार रुपये जमा केले. परंतु, नफा मिळवण्याचा प्रयत्न करताच तक्रारदारांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले आणि त्यांनी ऑनलाईन तक्रार दाखल केली.
सायबर सेलने तांत्रिक तपासाद्वारे आरोपींचे बँक खात्यांचे तपशील शोधले. कोटक बँकेचे एका खातेदार अमर त्र्यंबक फराटे (वय ३८) याचे खाते संशयास्पद आढळले. त्यामुळे सायबर सेलने तपास करून त्यास दौंड येथून ताब्यात घेतले. आरोपींच्या चौकशीत त्याने साथीदार संतोष पाचपुते (वय ३५) आणि शैलेश क्षीरसागर (वय ३७) यांच्या मदतीने हा गुन्हा केल्याची कबुली दिली. त्यानंतर मांजरी, पुणे येथे शैलेश क्षीरसागरला ताब्यात घेण्यात आले.
तिन्ही आरोपींनी एकत्र येऊन वेगवेगळ्या बँक खात्यांचा वापर करून ४ कोटींहून अधिक रक्कमेची फसवणूक केल्याचे कबूल केले आहे. सध्या या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून, अन्य आरोपींचा शोध घेण्यासाठी आणि फसवणुकीच्या रकमेचा मागोवा घेण्यासाठी पोलिसांची टीम कार्यरत आहे.
ही कामगिरी पोलीस निरीक्षक रविकिरण नाळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रविण स्वामी आणि सायबर सेलच्या पोलीस अंमलदारांनी केली.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: