पुणे : पुणे जिल्हा नागरी बँक असोसिएशन आणि अमनोरा येस फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने 'मीरा देशपांडे उत्कृष्ट योगदान पुरस्कार' सोहळा असोसिएशनच्या अरण्येश्वर येथील सभागृहात झाला. हा पुरस्कार सहकारी बँकिंग क्षेत्रातील महिलांच्या योगदानाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांच्या कार्याची दखल घेण्यासाठी दिला जातो.
यंदाच्या पुरस्कार विजेत्या:
१. श्रीमती अनुराधा गणपत गोरखे - श्री गजानन लोकसेवा सहकारी बँक चिंचवड
२. गीता मणियार - महेश सहकारी बँक
३. मंगल जाधव - राजर्षी शाहू सहकारी बँक
४. राजवर्धिनी तापकीर - संत सोपानकाका सहकारी बँक
ज्येष्ठ बँकिंग तज्ज्ञ विद्याधर अनास्कर यांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात आले. या वेळी त्यांनी महिला संचालकांना बँकेच्या कारभारात अधिक सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले. "बँकेच्या दृष्टीने काही गोष्टी चुकत असल्यास महिला संचालकांनी त्याचा विरोध केला पाहिजे. संचालक मंडळाच्या बैठकीला ज्ञानाधिष्ठित सहभाग असावा," असे मत त्यांनी व्यक्त केले.
अनास्कर यांनी पुढे सांगितले की, "बँकिंग क्षेत्रात महिला संचालकांचे योगदान मोठे आहे; परंतु त्यांना वाव दिला जात नाही. एखाद्या अडचणीच्या काळात पुरुष हतबल होतो; परंतु स्त्री ताकदीने उभी राहते. त्यामुळे बँकेच्या अडचणीच्या काळात महिला सक्षमतेने बँकेला पुढे नेऊ शकतात."
असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. सुभाष मोहिते यांनी पुरस्काराची पार्श्वभूमी सांगितली. "भगिनी निवेदिता बँकेच्या जडणघडणीमध्ये मीरा देशपांडे यांचे मोलाचे सहकार्य होते. त्यांच्या स्मरणार्थ २१,०००/- रुपये रोख व स्मृतिचिन्ह अशा स्वरूपाचा हा पुरस्कार दिला जातो," असे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाला सिटी कॉर्पोरेशन लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक अनिरुद्ध देशपांडे आणि अमनोरा येस फाउंडेशनचे विवेक कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: