पंतप्रधान आवास योजनेतील घरकुलासाठी मंजूर झालेले दीड लाख रुपये देण्यासाठी घेतली ५० हजारांची लाच
पुणे: पंतप्रधान आवास योजने अंतर्गत घरकुलासाठी मंजूर झालेल्या दीड लाख रुपयांचा हप्ता देण्यासाठी ५० हजार रुपयांची लाच मागितल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पीएमआरडीएच्या कनिष्ठ अभियंता, इंजिनिअर आणि एका खासगी व्यक्तीला ५० हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले.
अटक केलेल्या आरोपींची नावे तेजस संपत तावरे (वय ३२, कनिष्ठ अभियंता, कंत्राटी), हेमंत लालासो वांढेकर (वय २९, इंजिनिअर कंत्राटी), आणि रामदास ऊर्फ बाबू मारुती कटके (वय ४८, रा. भिवरी, ता. पुरंदर) अशी आहेत. हे सर्व आरोपी पीएमआरडीए कार्यालय, आकुर्डी, पिंपरी चिंचवड येथे कार्यरत होते.
तक्रारदार यांच्या वडिलांच्या नावाने पंतप्रधान आवास योजने अंतर्गत घरकुलासाठी अर्ज दाखल करण्यात आला होता. या योजनेतून तक्रारदारांना घरकुलाचे अडीच लाख रुपयांचे अनुदान मंजूर झाले होते. त्यापैकी पहिला हप्ता एक लाख रुपये तक्रारदारांच्या बँक खात्यात जमा झाला होता. उर्वरित दीड लाख रुपये जमा करण्यासाठी हेमंत वांढेकर व रामदास कटके यांनी तक्रारदारांकडे ५० हजार रुपयांची मागणी केली होती.
तक्रारदारांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. तपासादरम्यान, तेजस तावरे, हेमंत वांढेकर व रामदास कटके यांनी पीएमआरडीए कार्यालयात ओळख असल्याचे सांगितले. सापळा रचून सासवड बसस्टँडसमोरील हॉटेल सिद्धेश्वर येथे तक्रारदारांकडून ५० हजार रुपये घेताना तिघांना रंगेहाथ पकडण्यात आले. त्यांच्यावर सासवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यांना अटक करण्यात आली आहे.
Reviewed by ANN news network
on
८/०८/२०२४ १२:३५:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: