धुळे: शासनाने मंजूर केलेले थकीत वेतन व भविष्य निर्वाह निधीची रक्कम देण्यासाठी २ लाख रुपयांची लाच घेताना शिक्षणाधिकारी अधीक्षका मिनाक्षी भाऊराव गिरी यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे. ही कारवाई मंगळवारी धुळे जिल्ह्यातील शिक्षणाधिकारी कार्यालयात करण्यात आली.
प्रकरणाचा तपशील:
तक्रारदार व त्यांची पत्नी धुळे येथील महानगरपालिका हायस्कूलमध्ये विशेष शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. शासनाच्या ३० नोव्हेंबर २०२३ च्या निर्णयानुसार त्यांचे एप्रिल २०२२ ते ऑक्टोबर २०२३ या कालावधीतील थकीत वेतन आणि ७ व्या वेतन आयोगाचा तिसरा व चौथा हप्ता मंजूर करण्यात आला होता. शिक्षण संचालक पुणे यांनी हे थकीत वेतन धुळे येथील अधीक्षक (माध्यमिक) वेतन व भविष्य निर्वाह निधी कार्यालयाच्या खात्यात जमा केले होते. परंतु, हे वेतन तक्रारदार व त्यांच्या पत्नीस अद्याप मिळाले नव्हते.
लाचेची मागणी आणि सापळा:
तक्रारदारांनी मिनाक्षी गिरी यांची अनेक वेळा भेट घेऊन थकीत वेतनाची मागणी केली, परंतु गिरी यांनी २ लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली. तक्रारदारांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात तक्रार दाखल केली. मंगळवारी, या तक्रारीची पडताळणी करून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कार्यालयात सापळा रचला आणि तक्रारदारांकडून २ लाख रुपये घेताना गिरी यांना रंगेहाथ पकडले.
कारवाई:
या कारवाईचे नेतृत्व नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर, अपर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी, आणि वाचक पोलीस निरीक्षक स्वप्निल राजपूत यांनी केले. धुळे विभागाचे पोलीस उपअधीक्षक सचिन साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रुपाली खांडवी, राजन कदम, मुकेश अहिरे, प्रशांत बागुल, प्रविण पाटील, प्रविण मोरे, मकरंद पाटील, रामदास बारेला, सुधीर मोरे, आणि जगदीश बडगुजर यांनी ही कारवाई यशस्वीपणे पार पाडली.
Reviewed by ANN news network
on
८/२१/२०२४ ०१:२८:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: