भोसरी : चिखलीच्या मोरेवस्ती, म्हेत्रेवस्ती, नेवाळेवस्ती आणि आसपासच्या भागात गुन्हेगारीच्या वाढलेल्या घटनांमुळे स्थानिक नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. चोरी, घरफोडी, मारामाऱ्या, आणि अवैध धंद्यांनी परिसरातील वातावरण अस्वस्थ झाले असून नागरिकांची असुरक्षितता वाढली आहे.
नागरिकांची संतप्त प्रतिक्रिया:
गुन्हेगारीच्या वाढत्या घटनांमुळे चिखली आणि परिसरातील नागरिक अत्यंत नाराज आहेत. महिलांची सुरक्षा धोक्यात असून, रात्रीच्या वेळी बाहेर पडण्यास घाबरावं लागतं, अशी परिस्थिती आहे. अजित गव्हाणे यांच्यासमोर बोलताना नागरिकांनी स्थानिक नेतृत्वावर कठोर टीका केली आणि या भागाचा विकास रोखल्याचा आरोप केला.
ना पाणी, ना धड रस्ते
मोरेवस्ती, नेवाळेवस्ती भागातील महिलांनी पाणीपुरवठ्याची समस्या मांडली. लाखो रुपये खर्च करून फ्लॅट घेतले असले तरी पाणीपुरवठा वेळेवर होत नाही. तसेच, रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे वाहतुकीला अडथळा येत आहे. या सर्व समस्यांमुळे नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष पसरला आहे.
नागरिकरण वाढले पण सुविधांची वानवा : यश साने
चिखली परिसरात गेल्या काही वर्षांत नागरिकरण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. परंतु, त्याच वेगाने मूलभूत सुविधांची वानवा जाणवत आहे. गुन्हेगारीच्या घटनांमुळे परिसरातील नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. या समस्यांवर तातडीने उपाययोजना होण्याची गरज आहे.
राजकीय पाठिंब्याने गुन्हेगारी वाढली : विकास साने
सामाजिक कार्यकर्ते विकास साने यांनी स्थानिक नेतृत्वावर गुंडगिरीला प्रोत्साहन देण्याचा आरोप केला आहे. गुन्हेगारांना राजकीय पाठिंबा मिळाल्यामुळे या भागातील गुन्हेगारी वाढली असून, चिखली परिसराची प्रतिमा खराब झाली आहे. महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे, ज्यामुळे नागरिकांना चिंतेत टाकले आहे.
Reviewed by ANN news network
on
८/२१/२०२४ ०८:३५:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: