गणेशोत्सव आणि नवरात्रौत्सव साजरा करताना नियमांचे पालन करा; पुणे महापालिकेचे आवाहन

 


पुणे : पुणे महानगरपालिकेच्या अतिक्रमण आणि अनधिकृत बांधकाम निर्मूलन विभागाने पुणे शहरातील या वर्षीचा गणेशोत्सव आणि नवरात्रौत्सवाचे नियोजन करताना सर्व गणेश मंडळे, नागरिक, आणि संबंधित संस्थांना काही महत्त्वाच्या सूचना आणि अटींचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.महानगरपालिकेच्या नियमानुसार गणेशोत्सवाच्या उत्सवाचे यशस्वी आयोजन करण्यासाठी सर्व गणेश मंडळांनी व नागरिकांनी या नियमांचे पालन करावे, असे आवाहन पुणे महापालिकेचे आयुक्त राजेंद्र भोसले आणि उपायुक्त सोमनाथ बनकर यांनी केले आहे.

या संदर्भात महापालिकेने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की;गणेशोत्सव ७ सप्टेंबर ते १७ सप्टेंबर २०२४ या कालावधीत साजरा होणार आहे. मागील वर्षांच्या प्रमाणे, सन २०१९ मध्ये दिलेल्या उत्सव मंडप, स्वागत कमानी आणि रनिंग मंडपांच्या परवानग्या पुढील ५ वर्षांसाठी वैध राहणार आहेत. यामुळे परवानाधारकांना नव्याने परवानगी घेण्याची गरज नाही. तसेच, या परवानग्यांसाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.

नव्याने समाविष्ट झालेल्या गावांमधील गणेश मंडळांना २०१९ सालच्या कार्यपद्धतीनुसार नव्याने परवानग्या घ्याव्या लागतील, परंतु या परवान्यांवर देखील कोणतेही शुल्क लागू होणार नाही. नवीन परवानग्या पुढील ५ वर्षांसाठी वैध राहतील.

पुणे महापालिका आणि पुणे शहर पोलीस विभाग यांच्या सयुंक्त उपक्रमाद्वारे "एक खिडकी योजना" राबवून सर्व आवश्यक परवानग्या दिल्या जातील. गणेश मंडप उभारणीसाठी आवश्यक असलेल्या सर्व नियमांचे पालन करणे बंधनकारक राहील. मंडपाची उंची ४० फुटांपेक्षा जास्त असल्यास, स्थापत्य अभियंता यांचे स्थिरता प्रमाणपत्र जोडणे आवश्यक असेल.

उत्सव मंडप उभारणीसाठी आपत्कालीन गाड्यांच्या वाहतुकीसाठी रस्ते मोकळे ठेवणे, मंडपाच्या उंचीची योग्य दक्षता घेणे, तसेच स्वयंसेवक किंवा सुरक्षारक्षक नेमणे आवश्यक राहील. गणेशमूर्तींची स्थापना करताना पर्यावरणपूरक शाडू मातीच्या मूर्तींचाच वापर करावा.

गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सवाच्या कालावधीत ध्वनीप्रदूषणाचे नियम पाळणे अत्यावश्यक आहे. उत्सव संपल्यानंतर मंडप, स्टेज, रनिंग मंडप, कमानी, रस्त्यावरील देखावे, विटांमधील बांधकामे इत्यादी स्वखर्चाने ताबडतोब हटवून संबंधित जागा स्वच्छ करणे बंधनकारक राहील.

महानगरपालिकेने तक्रारींचे निराकरण करण्यासाठी विविध माध्यमांद्वारे तक्रार निवारण यंत्रणा कार्यान्वित केली आहे. नागरिकांना त्यांच्या तक्रारी http://complaint.punecorporation.org या संकेतस्थळावर, टोल फ्री नंबर 1800 103 0222 वर, पुणे Connect (PMC Care) मोबाईल अॅपवर, अथवा 9689900002 या व्हॉट्सअप क्रमांकावर नोंदवता येतील.

 विक्रेत्यांना मनपाच्या रस्त्यांवर गणेशमूर्ती विक्री स्टॉल्स उभारण्यास परवानगी दिली जाणार नाही. यासाठी मनपा शाळांची पटांगणे आणि मोकळ्या जागा वापरण्यासाठी परवानगी देण्यात येईल.


गणेशोत्सव आणि नवरात्रौत्सव साजरा करताना नियमांचे पालन करा; पुणे महापालिकेचे आवाहन गणेशोत्सव आणि नवरात्रौत्सव साजरा करताना नियमांचे पालन करा; पुणे महापालिकेचे आवाहन Reviewed by ANN news network on ८/२१/२०२४ ०९:०२:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".