जिओजित शेअर ट्रेडिंग स्कॅम प्रकरणात एकाला उल्हासनगर येथून अटक

 


पुणे: किवळे येथील एका व्यक्तीला शेअर मार्केट ट्रेडिंगमध्ये गुंतवणुकीचे आमिष दाखवून २० लाख २४ हजार रुपयांची फसवणूक करणाऱ्या एका आरोपीला सायबर सेलच्या पथकाने उल्हासनगर, ठाणे येथून अटक केली आहे. 

अजयकुमार किशनलाल आर्या असे आरोपीचे नाव आहे.त्याचे साथीदार निखिल सेलवानी आणि परमान साजीदअली खान यांचा शोध सुरू आहे.

 या प्रकरणी किवळे येथील एका व्यक्तीने पोलिसात तक्रार दिली होती. आरोपीने तक्रारदार यांना आरोपीने *Geojit Financial Securities Limited* या नावाने इंस्टाग्रामवर ट्रेडिंग लिंक पाठवली होती. यानंतर, तक्रारदारास व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामील करून, कंपनीला सेबीची मान्यता असल्याचे भासविले. कंपनीच्या प्लॅटफॉर्मवर शेअर ट्रेडिंग केल्यास चांगला फायदा मिळेल, असे सांगून तक्रारदाराचा विश्वास संपादन केला. तक्रारदाराने वेगवेगळ्या बँक खात्यांवर एकूण २० लाख २४ हजार रुपये भरले. परंतु, फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तक्रारदाराने प्रथम ऑनलाईन तक्रार केली आणि नंतर देहुरोड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

तक्रार मिळाल्यानंतर देहुरोड पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर ३६९/२०२४ अंतर्गत भारतीय दंड विधान कलम ४०६, ४२० सह माहिती तंत्रज्ञान कायदा २००० चे कलम ६६(सी) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. सायबर सेलच्या तपासात आरोपीने फसवणुकीसाठी विविध बँक खात्यांचा वापर केल्याचे निष्पन्न झाले. या तपासात उल्हासनगर, ठाणे येथील एक खातेदार असल्याचे आढळले. त्यानंतर, सायबर सेलच्या पथकाने उल्हासनगर येथे छापा टाकला आणि आरोपी अजयकुमार किशनलाल आर्या याला ताब्यात घेतले. 

सायबर सेलच्या अधिक तपासात आर्या याने निखिल सेलवानी आणि परमान साजीद अली खान यांच्या सांगण्यावरून बँक खात्यांचा वापर करून फसवणूक केल्याची कबुली दिली. त्याने वेळोवेळी आपल्या कोटक बँक खात्यात फ्रॉडची रक्कम जमा करून एटीएमद्वारे पैसे काढले आणि ते साथीदारांना दिले असे सांगितले. आरोपीचा गुन्ह्यात सक्रिय सहभाग असल्याचे स्पष्ट झाल्यामुळे त्याला ताब्यात घेऊन पुढील तपासासाठी देहुरोड पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे. 

इतर पळून गेलेल्या आरोपींचा आणि फ्रॉडची ज्या रक्कम बँकखात्यांवर जमा झाली आहे त्यांचा तपास सध्या सुरू आहे.

ही कारवाई पोलीस निरीक्षक रविकिरण नाळे, सहायक निरीक्षक प्रवीण स्वामी, सीमा मुंढे, उपनिरीक्षक सागर पोमण, अंमलदार प्रिया वसावे, अतुल लोखंडे, सौरभ घाटे, दिपक भोसले, नितेश बिचेवार, श्रीकांत कबुले, स्वप्निल खणसे, कृष्णा गवळी, विशाल गायकवाड, बळीराम नवले, अभिजीत उकिरडे यांच्या पथकाने केली.

जिओजित शेअर ट्रेडिंग स्कॅम प्रकरणात एकाला उल्हासनगर येथून अटक जिओजित शेअर ट्रेडिंग स्कॅम प्रकरणात एकाला उल्हासनगर येथून अटक Reviewed by ANN news network on ८/२२/२०२४ ०२:५८:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".