जुन्या महामार्गावर ९८ किलो गांजा जप्त ; चौघांना अटक

 


पुणे: पुणे ग्रामीण पोलिसांनी केलेल्या कारवाईत ९८ किलो गांजा जप्त करण्यात आला असून, या प्रकरणी चार जणांना अटक करण्यात आली आहे. जप्त केलेल्या गांजाची किंमत सुमारे ४८ लाख ५० हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.

कामशेत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रविंद्र पाटील यांना त्यांच्या गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार, कामशेत-मावळ मार्गावर जुन्या महामार्गाकडून ताजे गावाच्या दिशेने लोणावळ्याकडे जाणाऱ्या एका चारचाकी वाहनात गांज्याची वाहतूक होत असल्याचे समजले. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून कारवाई केली.

पोलिसांनी पांढऱ्या रंगाच्या वेरना कारला थांबवून तपासणी केली असता, कारच्या डिकीमध्ये ९८ किलो वजनाचा गांजा सापडला. या कारवाईत पोलिसांनी गांज्यासह वापरलेली चारचाकी गाडी आणि ३ मोबाईल असा एकूण ५६ लाख ९२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

या प्रकरणी अभिषेक अनिल नागवडे (वय २४), प्रदीप नारायण नामदास (वय २५), योगेश रमेशलगड (वय ३२) आणि वैभव संजीवन चेडे (वय २३) या चौघांना अटक करण्यात आली आहे. सर्व आरोपी कारेगाव (ता. शिरूर) येथील रहिवासी आहेत.

आरोपींविरुद्ध कामशेत पोलीस ठाण्यात गुंगीकारक औषधी द्रव्ये आणि मनःस्थितीवर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ च्या कलम ८(क) व २०(क) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक रविंद्र पाटील यांच्या नेतृत्वाखाली पुढील तपास सुरू आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे आणि सहायक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईत पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण, सहायक फौजदार नितेश कदम यांच्यासह अनेक पोलीस कर्मचाऱ्यांचा सहभाग होता.

या यशस्वी कारवाईमुळे पुणे ग्रामीण भागातील अंमली पदार्थांच्या तस्करीवर आळा घालण्यात पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. पोलीस आता या प्रकरणाचा सखोल तपास करत असून, गांजा तस्करीच्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

जुन्या महामार्गावर ९८ किलो गांजा जप्त ; चौघांना अटक जुन्या महामार्गावर ९८ किलो गांजा जप्त ; चौघांना अटक Reviewed by ANN news network on ८/२४/२०२४ ०२:०४:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".