पुणे : दहीहंडी उत्सवादरम्यान तात्काळ मदत क्रमांक १०० वर खोटी माहिती दिल्याप्रकरणी पुणे शहरातील एका तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
२७ ऑगस्ट २०२४ रोजी, दहीहंडी उत्सवाच्या वेळी, एका व्यक्तीने तात्काळ मदत क्रमांक १०० वर कॉल करून सांगितले की, "कमला नेहरू हॉस्पिटल जवळ ३० ते ४० लोक तलवारींसह फिरत आहेत, त्यांच्याकडे दारूच्या बाटल्या आहेत, आणि माझ्यावर हल्ला होऊ शकतो. मला पोलीस मदत हवी आहे."
ही माहिती मिळताच, पोलिसांनी तात्काळ बीट मार्शलला घटनास्थळी पाठवले. मात्र, घटनास्थळी असे कोणतेही प्रकार आढळले नाहीत. बीट मार्शलने कॉल करणाऱ्या व्यक्तीशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्याचा मोबाईल बंद असल्याचे आढळून आले.
या खोट्या कॉलची गंभीर दखल घेत पुणे शहराचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी तपासाची सूचना दिली. तपासादरम्यान, कॉल करणाऱ्या मोबाईल क्रमांकाची तांत्रिक माहिती गोळा केली असता, तो मंगळवार पेठेत राहणाऱ्या महिलेच्या नावावर नोंद असल्याचे आढळले. मात्र, चौकशीतून कळाले की सदर सीम कार्ड तिच्या बहीणीचा मुलगा रोहित मुकेश चव्हाण (वय २२ वर्षे) वापरत होता.
चौकशीदरम्यान, रोहितने दहीहंडीच्या दिवशी कामावर जात असताना गर्दी पाहून खोटी माहिती दिल्याचे मान्य केले. त्यानंतर त्याने मोबाईल बंद करून कामावर निघून गेल्याचे सांगितले. या खोट्या कॉलमुळे पोलिसांची वेळ आणि संसाधनांचा अपव्यय झाला.
खोटी माहिती देणाऱ्या रोहितविरुद्ध बीट मार्शल विवेक पाटील यांच्या तक्रारीवरून भारतीय दंड संहिता कलम २१७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुणे शहर पोलीसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, तात्काळ मदत क्रमांकाचा वापर अत्यंत सजगपणे आणि जबाबदारीने करावा. खोटी माहिती देणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई होणार आहे.
ही कामगिरी वरिष्ठ निरीक्षक प्रशांत भस्मे आणि त्यांच्या पथकाने केली आहे.
नागरिकांनी तात्काळ मदत क्रमांकाचा गैरवापर करू नये, असा पोलिसांकडून आवाहन करण्यात आले आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: