पुणे: दौंड तालुक्यातील मळद गावातील भैरवनाथ माध्यमिक विद्यालयात घडलेल्या अत्यंत गंभीर प्रकरणाने परिसरात खळबळ उडाली आहे. शाळेतील इंग्रजी शिक्षकाने अनेक अल्पवयीन विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण केल्याचे उघडकीस आले असून, या प्रकरणी शिक्षक आणि मुख्याध्यापक दोघांनाही अटक करण्यात आली आहे.
दौंड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष डोके यांनी दिलेल्या माहितीनुसार, इंग्रजी विषयाचे शिक्षक बापूराव धुमाळ याने सातवी, आठवी आणि नववीतील सुमारे आठ ते नऊ विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण केले. धुमाळ याने व्हाट्सअॅप व्हिडिओ कॉल आणि इतर डिजिटल माध्यमांचा वापर करून विद्यार्थिनींचे अश्लील फोटो काढून त्यांना ब्लॅकमेल केल्याचे समोर आले आहे.
या गंभीर प्रकरणाची माहिती पालकांनी अगोदरच शाळेचे मुख्याध्यापक सुभाष भीमराव वाखारे यांना दिली होती. मात्र, वाखारे यांनी या तक्रारीकडे दुर्लक्ष केल्याने आरोपी धुमाळला आणखी बळ मिळाले आणि त्याने पुन्हा विद्यार्थिनींवर अत्याचार केले.
घटनेची माहिती मिळताच संतप्त पालकांनी शाळा प्रशासनाला जाब विचारला. त्यानंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत मुख्याध्यापक सुभाष वाखारे यांना अटक केली. मुख्य आरोपी बापूराव धुमाळ प्रथम फरार झाला होता, परंतु नंतर मध्यरात्री पोलिसांनी त्यालाही अटक केली.
पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे. शैक्षणिक संस्थांमधील अशा गंभीर घटनांमुळे पालक आणि समाजात तीव्र संताप व्यक्त होत असून, दोषींवर कठोर कारवाईची मागणी होत आहे. शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत अधिक जागरूकता आणि कडक उपाययोजनांची गरज या घटनेने अधोरेखित केली आहे.
Reviewed by ANN news network
on
८/२३/२०२४ ११:२१:०० AM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: