पुणे : पुणे शहरात दस्त नोंदणी प्रक्रियेदरम्यान एका खाजगी वकिलाने लाच घेतल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) केलेल्या कारवाईत ६१ वर्षीय वकिलाला अटक करण्यात आली आहे.
माधव वसंत नाशिककर यांनी दस्त नोंदणी अधिकाऱ्यासाठी म्हणून ३,००० रुपयांची लाच स्वीकारली. ही घटना मंगळवारी (१३ ऑगस्ट) खडकमाळ रोड, शिवाजीवाडी येथे घडली. एका ४३ वर्षीय व्यक्तीने या प्रकरणी एसीबीकडे तक्रार दाखल केली होती. तक्रारदाराच्या पत्नीच्या नावे एक सदनिका खरेदी करण्यात आली होती, जिची नोंदणी दुय्यम निबंधक कार्यालय क्रमांक एक हवेली येथे करण्यात आली होती. सर्व आवश्यक शुल्क आणि फी ऑनलाइन पद्धतीने भरण्यात आल्या होत्या.
दस्त नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, नाशिककर यांनी दस्त नोंदणी अधिकाऱ्यासाठी म्हणून अतिरिक्त ५,००० रुपयांची मागणी केली. तक्रारदाराने याबाबत एसीबीला कळवले, त्यानंतर एसीबीने सापळा रचून नाशिककर यांना ३,००० रुपये स्वीकारताना रंगेहात पकडले. या प्रकरणी खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Reviewed by ANN news network
on
८/१४/२०२४ ०२:४४:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: