यवतमाळ : यवतमाळच्या प्रतिष्ठित बाबाजी दाते महिला सहकारी बँकेतील एक आर्थिक घोटाळा उघडकीस आला आहे. बँकेच्या संचालक मंडळ, मुख्याधिकारी, व्यवस्थापक आणि लेखापरीक्षक यांनी मिळून बनावट दस्तऐवजांच्या आधारे तब्बल २४२ कोटी रुपयांचा अपहार केल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी विशेष लेखापरीक्षकांनी केलेल्या तपासणीनंतर दाखल केलेल्या तक्रारीवरून मंगळवारी पहाटे अवधूतवाडी पोलिस ठाण्यात २०६ जणांविरुद्ध गंभीर स्वरूपाचे गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.
यवतमाळच्या पहिल्या महिला बँक म्हणून ओळखलेल्या बाबाजी दाते महिला सहकारी बँकेत स्थानिक रोजगारकर्मी, छोट्या पतसंस्था आणि सामान्य नागरिकांनी विश्वासाने आपल्या कष्टाची कमाई ठेवली होती. मात्र, बँकेच्या संचालक मंडळाने या विश्वासाला तडा देत बोगस कर्ज प्रकरणे तयार करून ठेवीदारांच्या पैशांचा अपहार केला.
विशेष लेखापरीक्षकांनी केलेल्या तपासणीत १४२ कर्ज प्रकरणांमध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता आढळून आली. या घोटाळ्याची व्याप्ती १ एप्रिल २००६ ते ३१ मार्च २०२१ या कालावधीतील असल्याचे स्पष्ट झाले आहे.
या प्रकरणी फसवणूक, विश्वासघात, बनावट दस्तएवज तयार करणे आदी कलमांखाली संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: