पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने 'रेंटो इंडिया' कंपनीच्या संचालकांना अटक केली असून, सुमारे ७ कोटी रुपयांच्या फसवणुकीचा पर्दाफाश झाला आहे. कंपनीच्या संचालक व भागीदार संदीपकुमार लालबहादूर आणि सीमा मित्तल यांना अटक करण्यात आली आहे.
'रेंटो इंडिया' कंपनीने १३ जून २०२३ पासून गुंतवणूकदारांना आकर्षक गुंतवणूक योजना जाहीर केली होती. या योजनेनुसार, भाड्याने घेतलेल्या ई-ऑटो रिक्षा पेटीएम, फ्लिपकार्ट, अॅमेझॉन, झोमॅटो, स्विगी अशा कंपन्यांमध्ये भाड्याने लावून दरमहा ३१,००० रुपये भाडे कमवा, असे आमिष दाखवले होते. तसेच सोन्या-चांदीच्या नाण्यांची बुकिंग करताना फायदा मिळेल, असेही सांगितले होते.
कंपनीने ब्रोशरमध्ये त्यांच्या डिलिव्हरी पार्टनर्स म्हणून जाहिरात केली होती. तसेच पॅजीओ, महिंद्रा, बजाज यांसारख्या कंपन्यांशी असोसिएट ब्रँड पार्टनर असल्याचा दावा केला होता. कंपनीने फ्रॅंचायझी योजनाही जाहीर केली होती,
आरोपींनी अहमदनगर आणि वाशी (मुंबई) येथेही कंपनीची कार्यालये सुरू करून तेथेही नागरिकांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. गुंतवणूकदारांना ई-रिक्षांमध्ये १ लाख ११हजार रुपये गुंतवण्यास भाग पाडले. काही गुंतवणूकदारांकडून रोख रक्कम घेतली.
एकूण ७३२ गुंतवणूकदारांकडून विविध मार्गांनी सुमारे ७ कोटी रुपये जमा केले गेले. त्यानंतर कंपनी अचानक बंद करून आरोपी फरार झाले. पोलिसांनी १७ ऑगस्ट २०२४ रोजी नोएडा (उत्तर प्रदेश) येथून आरोपींना अटक केली.
वाकड पोलीस ठाण्यात भा.दं.वि. कलम ४२०, ४०६, ४०९, १२०(ब), ३४ सह महाराष्ट्र ठेवीदारांच्या हितासंबंधाचे संरक्षण अधिनियम १९९९ च्या कलम ३, ४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक वनिता धुमाळ या गुन्ह्याचा तपास करत आहेत.
पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. पोलिसांनी या प्रकरणात फसवणूक झालेल्या अन्य व्यक्तींना आर्थिक गुन्हे शाखेशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.
Reviewed by ANN news network
on
८/२४/२०२४ ०७:०७:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: