मुंबई : महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाची (MHADA) बनावट वेबसाईट तयार करून अनेक नागरिकांना फसवणूक करणाऱ्या दोघांना सायबर पोलीसांनी अटक केली आहे. हे दोघे व्यक्ती https://housing.mhada.gov.in/ या म्हाडाच्या अधिकृत वेबसाईटसारखे www.mhada.org हे बनावट वेबपोर्टल तयार करून, २०२४ साठीच्या सदनिकांच्या नोंदणीसाठी अर्ज व शुल्क स्वीकारून अनेकांना गंडा घालत होते.
फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर काही नागरिकांनी दिलेल्या तक्रारीवरून बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स येथील सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस पथकाने तातडीने तपास सुरू केला आणि शिताफीने या प्रकरणात दोन व्यक्तींना अटक केली आहे.
या आरोपींनी बनावट वेबसाईट तयार करून नागरिकांना म्हाडाच्या घरे लॉटरीशिवाय, ओळखीने स्वस्तात मिळवून देण्याचे आमिष दाखवून त्यांच्या बँक खात्यातून पैसे उकळले होते. नागरिकांनी अधिकृत वेबसाईटची योग्य प्रकारे पडताळणी न करता या बनावट पोर्टलवर विश्वास ठेवून अर्ज आणि शुल्क भरले. परिणामस्वरूप अनेकांनी आपले कष्टाचे पैसे गमावले.
मुंबई पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेमार्फत नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. कोणत्याही अनोळखी व्यक्तीकडून मोबाईल, फोनवरील माहिती जसे की बँक अकाउंट नंबर, पासवर्ड, ओ.टी.पी., केवायसी, डेबिट कार्ड क्रमांक, आधार क्रमांक, पॅनकार्ड क्रमांक देऊ नका. तसेच अनोळखी व्यक्तींच्या सांगण्यावरून कोणतेही मोबाईल ॲप डाउनलोड करू नका, किंवा पाठवलेल्या लिंकवर क्लिक करू नका. जर कोणत्याही प्रकारे फसवणूक होत असल्याचा संशय आल्यास तात्काळ नजिकच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधा.
सदर प्रकरणात आरोपींना अटक करण्यात आल्यानंतर आता तपास सुरू आहे, आणि पुढील चौकशी करून या फसवणुकीचे मूळ उघड करण्याचे प्रयत्न केले जात आहेत.
Reviewed by ANN news network
on
८/१९/२०२४ ०३:३२:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: