इंद्रायणीनगरमध्ये "दिसली मोकळी जागा की मार ताबा" टोळीचा धुडगूस; रहिवासी भयभीत

पिंपरी : एकेकाळी सुसज्ज आणि नियोजित असलेले इंद्रायणीनगर आज बकालपणाच्या विळख्यात सापडले आहे. "दिसली मोकळी जागा की मार ताबा" या टोळीच्या कारवायांमुळे या भागातील रहिवासी दहशतीखाली वावरत आहेत. सोसायट्यांच्या आणि घराबाहेरील मोकळ्या जागांवर अतिक्रमण करून मनमानी पद्धतीने ताबा घेतला जात आहे. या परिस्थितीमुळे नागरिकांच्या जीवनात असुरक्षितता आणि अशांतता वाढली आहे. रविवारी (दि. १८) स्थायी समितीचे माजी अध्यक्ष अजित गव्हाणे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत इंद्रायणीनगरच्या रहिवाशांनी त्यांच्या व्यथा मांडल्या.

"परिवर्तनाची गरज" - नागरिकांची मागणी

रविवारी इंद्रायणीनगर स्पाईन रोडलगतच्या पर्ल बँक्वेट हॉलमध्ये आयोजित बैठकीत नागरिकांनी त्यांच्या समस्यांवर आवाज उठवला. उपस्थितांमध्ये माजी नगरसेवक संजय वाबळे, विक्रांत लांडे, माणिक जैद, पांडुरंग सांडभोर, इम्रान शेख, संजय उदावंत, निवृत्ती शिंदे, सुदाम शिंदे, विजयकुमार पिरंगुटे, पांडुरंग सांडभोर, श्रीकृष्ण म्हेत्रे, अशोक मोरे यांसारख्या स्थानिक प्रतिनिधींसह ज्येष्ठ नागरिक आणि युवा कार्यकर्ते उपस्थित होते.

नागरिकांनी इंद्रायणीनगरमध्ये झालेल्या बकालपणाच्या मुद्द्यांकडे लक्ष वेधले. या भागातील मोकळ्या जागांवर होत असलेल्या अतिक्रमणामुळे चौकांत वाहतूक कोंडी वाढली आहे, गुन्हेगारीचे प्रमाणही वाढले आहे, आणि महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर झाला आहे. गेल्या दहा वर्षांत छोट्या व्यावसायिकांसाठी हॉकर्स झोनचे कोणतेही नियोजन न केल्यामुळे अतिक्रमण आणि हप्तेवसूली वाढली आहे. त्यामुळे इंद्रायणीनगरमध्ये अस्थिरता आणि नागरिकांत अस्वस्थता पसरली आहे.

"ओमनगरीतील मोकळ्या जागेचे राजकारण"

इंद्रायणीनगरमधील ओमनगरी शेजारील मोकळ्या जागेवर असलेल्या दत्त मंदिराजवळील जागेत बेकायदेशीर पाण्याच्या टाकीचे काम सुरू करण्यात आले. या कामासाठी स्थानिक नागरिकांची परवानगी घेतली गेली नाही, ज्यामुळे नागरिकांनी एकत्र येऊन उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले. त्यामुळे सद्यस्थितीत हे काम बंद आहे. नागरिकांनी पाण्याच्या टाकीच्या आरक्षणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आणि या जागेचा वापर मुलांच्या खेळण्यासाठी आणि ज्येष्ठ नागरिकांच्या कार्यक्रमांसाठी असावा, असे स्पष्ट केले.

"आमदारांच्या भ्रष्टाचाराचा पर्दाफाश"

भोसरी मतदार संघातील अतिक्रमण आणि पथारीवाल्यांच्या समस्या गेल्या दहा वर्षांत दुपटीने वाढल्या आहेत. मात्र, याच समस्यांचा वापर करून येथील आमदारांनी केवळ स्वतःचे खिसे भरले. छोट्या व्यावसायिकांना हॉकर्स झोनची प्रतीक्षा आहे, पण त्या दिशेने कोणतेही ठोस पाऊल उचलले गेले नाही. यामुळे स्थानिक रहिवासी आता बदलाच्या मागणीसाठी उघडपणे बोलू लागले आहेत.

अजित गव्हाणे
माजी अध्यक्ष, स्थायी समिती, पिंपरी चिंचवड महापालिका

इंद्रायणीनगरमध्ये "दिसली मोकळी जागा की मार ताबा" टोळीचा धुडगूस; रहिवासी भयभीत  इंद्रायणीनगरमध्ये "दिसली मोकळी जागा की मार ताबा" टोळीचा धुडगूस; रहिवासी भयभीत Reviewed by ANN news network on ८/१९/२०२४ ०२:५४:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".