पुणे : मुस्लिम, ख्रिश्चन, मराठा, धनगर आरक्षण, आणि मूलभूत हक्कांच्या संरक्षणासाठी 'कोंढवा ते दिल्ली' सामाजिक न्याय पदयात्रेचे आयोजन १ सप्टेंबरपासून करण्यात आले आहे. ही माहिती इनक्रेडीबल समाजसेवक ग्रुप आणि अखिल भारतीय आरक्षण कृती समितीचे संयोजक असलम बागवान यांनी पत्रकार परिषदेत दिली.
पदयात्रेची माहिती आणि मार्ग:
ही पदयात्रा १ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता कोंढव्यातून सुरू होणार आहे. पदयात्रेचा मार्ग किल्ले शिवनेरी, संगमनेर, कोपरगाव, येवला, अमळनेर, चोपडा, फैजपूर मार्गे दिल्ली असा आहे. २ ऑक्टोबर रोजी गांधी जयंतीच्या दिवशी राजघाट, नवी दिल्ली येथे एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण केले जाणार आहे. त्यानंतर ३ ऑक्टोबर रोजी जंतर मंतर येथे आंदोलन आयोजित करण्यात आले आहे. पदयात्रा ९ ऑक्टोबर रोजी पुण्यात परत येणार आहे.
पत्रकार परिषदेत मांडण्यात आलेले मुद्दे:
१) आरक्षणाचा उद्देश:
आरक्षण म्हणजे शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक, आणि राजकीय क्षेत्रातील कमकुवत वर्गाला संधी उपलब्ध करून देणे. परंतु अनेक दशकांपासून आरक्षणाच्या मागण्यांचा राजकीय हेतूसाठी वापर होत आहे. संसदेत विधेयक आणून इंदिरा साहनी निर्णयानुसार आरक्षणावरील बंदी हटवल्याशिवाय ही प्रवृत्ती थांबणार नाही.
२)अल्पसंख्याकांच्या हक्कांचे संरक्षण:
संसदेत अल्पसंख्याकांच्या संरक्षणासाठी ॲट्रॉसिटी कायद्याचे विधेयक आणणे गरजेचे आहे. अल्पसंख्याकांचे हक्क आणि अधिकार यासाठी संसदेत सुरक्षा कवच निर्माण करणे आवश्यक आहे.
३) मूलभूत अधिकारांचे संरक्षण:
भारतीय राज्यघटनेने दिलेले मूलभूत अधिकार कलम ३२ द्वारे संरक्षित आहेत. संसदेत घटनेच्या कलम ३२/३ नुसार सुधारणा केली तर देशातील प्रत्येक न्यायालयात या अधिकारांची अंमलबजावणी होऊ शकते.
४) महिला आरक्षण विधेयक:
२०२३ मध्ये मंजूर झालेले महिला आरक्षण विधेयक लागू करण्याची मागणीही पदयात्रेत केली जाणार आहे.
५) जात आधारित जनगणना:
शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक, आणि धार्मिक निकषांवर आधारित जात आधारित जनगणनेची मागणी पदयात्रेत केली जाणार आहे.
६) भीमराव आंबेडकर यांच्या जन्मस्थळावर स्मारक:
महू येथील भीमराव आंबेडकर यांच्या जन्मस्थळावर बेकायदेशीरपणे स्मारक समिती स्थापन करून भीमप्रेमींशी खेळण्याच्या विरोधात आवाज उठवण्यात येणार आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: