अलिबाग: कुरूळ ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक श्रीहरी अर्जुनराव खरात आणि लिपिक सुजित शाम पाटील उर्फ पिंटया यांना ५० हजार रुपये लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग रायगड यांनी ही कारवाई केली आहे.
तक्रारदारांनी मौजे कुरूळ गट क्रमांक ३४/४ या जागेवर स्वतंत्र घर बांधले होते. या घराला घरपट्टी आकारून असेसमेंट उतारा मिळण्यासाठी तक्रारदारांनी ग्रामसेवक श्रीहरी खरात यांच्याशी संपर्क साधला होता. खरात यांनी या कामासाठी ५० हजार रुपये लाचेची मागणी केली होती.
तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग रायगडकडे तक्रार नोंदवली. त्यानुसार, १६ ऑगस्ट २०२४ रोजी तपासणीसाठी सापळा रचला गेला. सापळा कारवाईच्या वेळी, २० ऑगस्ट २०२४ रोजी, कुरूळ ग्रामपंचायत कार्यालयात तक्रारदाराकडून ५० हजार रुपयांची लाच घेताना ग्रामसेवक श्री. खरात आणि लिपिक श्री. पाटील यांना रंगेहाथ पकडण्यात आले.
श्रीहरी खरात आणि सुजित पाटील यांच्याविरुद्ध अलिबाग पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम, १९८८ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईचे मार्गदर्शन रायगड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे वरिष्ठ अधिकारी करीत आहेत.
Reviewed by ANN news network
on
८/२२/२०२४ १२:५८:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: