पुणे:रांझे गावातील २० गुंठे जागेची फेरफार नोंद घेण्यासाठी २० हजार रुपयांची लाच मागणाऱ्या तलाठ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे.
सुधीर दत्तात्रय तेलंग (वय ५६), असे तलाठ्याचे नाव असून ते भोर तालुक्यातील रांझे गावचे तलाठी आहेत, त्यांनी तक्रारदाराकडून या रकमेची मागणी केली होती.
तक्रारदाराने रांझे गावात २० गुंठे जागा खरेदी केली होती, त्याची ऑनलाईन फेरफार नोंद घेण्यासाठी त्यांनी तलाठी सुधीर तेलंग यांच्याशी संपर्क साधला. तलाठ्याने प्रत्येक गुंठ्यासाठी १ हजार रुपये प्रमाणे एकूण २० हजार रुपये लाचेची मागणी केली.
तक्रारदाराने या प्रकरणाची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला दिली. या तक्रारीची पडताळणी पंचासमक्ष करण्यात आली. तलाठ्याने तडजोडीनंतर २० हजार रुपये लाच स्वीकारली असता, त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले. या प्रकरणी राजगड पोलीस स्टेशन, पुणे ग्रामीण येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम, १९८८ अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
या प्रकरणाचा तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक प्रसाद लोणारे करत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक अमोल तांबे आणि अपर अधीक्षक डॉ. शीतल जानवे यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभाग कार्यालयाने केली.
Reviewed by ANN news network
on
८/२२/२०२४ १२:३९:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: