उरणमध्ये बदलापूर घटनेचा महाविकास आघाडीने केला निषेध


विठ्ठल ममताबादे 

उरण : बदलापूर येथील दुर्दैवी घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने आज उरण शहरात एक तासाचे शांततापूर्ण आंदोलन केले. न्यायालयाच्या निर्देशानुसार महाराष्ट्र बंदचे आवाहन मागे घेतले असले तरी, महिलांच्या सुरक्षेसाठी लढा सुरूच ठेवण्याचा निर्धार आघाडीने व्यक्त केला.

दुपारी ११ ते १२ या वेळेत महात्मा गांधी पुतळ्याजवळ झालेल्या निदर्शनात महाविकास आघाडीच्या नेत्यांनी काळी फीत बांधून आपला निषेध नोंदवला. शिवसेना (उद्धव ठाकरे गट), राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि इतर पक्षांचे नेते या कार्यक्रमात सहभागी झाले होते.

शेतकरी कामगार पक्षाचे जेष्ठ नेते काका पाटील म्हणाले, "महिलांच्या सुरक्षेसाठी अधिक कठोर कायदे करण्याची गरज आहे. अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी समाजात व्यापक जनजागृती करणे आवश्यक आहे."

शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) रायगड जिल्हा प्रमुख तथा माजी आमदार मनोहर भोईर यांनी सरकारवर टीका करताना म्हटले, "महिला सुरक्षेबाबत सरकारने अधिक गांभीर्याने पावले उचलली पाहिजेत. आम्ही सातत्याने या मुद्द्यावर आवाज उठवत राहू."

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महाराष्ट्र राज्य महिला प्रदेश सरचिटणीस भावना घाणेकर यांनी महिला सुरक्षेसाठी सर्वपक्षीय एकजूट होण्याचे आवाहन केले.

काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र राज्य चिटणीस मिलिंद पाडगावकर यांनी या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध करत सरकारकडून कठोर कारवाईची मागणी केली.

निदर्शनात उरण विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे पदाधिकारी, नगरसेवक, शाखा प्रमुख, सरपंच, युवक संघटना, महिला आघाडी, युवा सेना, विद्यार्थी संघटना यांच्यासह विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

उरणमध्ये बदलापूर घटनेचा महाविकास आघाडीने केला निषेध उरणमध्ये बदलापूर घटनेचा महाविकास आघाडीने केला निषेध Reviewed by ANN news network on ८/२४/२०२४ ०८:२६:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".