नाशिक : नाशिक शहरातील पंचवटी परिसरात एका धक्कादायक घटनेने सर्वांना हादरवून टाकले आहे. एका शिक्षिकेने आपल्या प्रियकराच्या हत्येसाठी सुपारी दिल्याचे उघडकीस आले आहे. पंचवटी पोलिसांनी या प्रकरणाचा तपास अवघ्या पाच तासांत पूर्ण करून आरोपींना ताब्यात घेतले आहे.
संकेत रणदिवे (२०), मेहफुज सैयद (१८), रितेश सपकाळे (२०) आणि गौतम दुसाने (१८) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. चौकशीदरम्यान त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आणि भावना कदम (रा. वृंदावन नगर, म्हसरूळ) या शिक्षिकेने ही खुनाची सुपारी दिल्याचा धक्कादायक खुलासा केला. त्यामुळे तिलाही पोलिसांनी अटक केली आहे.
या प्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार २० ऑगस्ट रोजी सकाळी पंचवटी दिंडोरी रोडवरील मेरी वसाहतीजवळ असलेल्या पंजाबराव देशमुख वसतिगृहासमोर एका युवकाचा मृतदेह आढळला. मृतक गगन कोकाटे हा निवृत्त पोलीस कर्मचारी प्रवीण कोकाटे यांचा मुलगा असल्याचे निष्पन्न झाले. गगनच्या डोक्यावर धारदार शस्त्राने वार करून त्याची निर्घृण हत्या करण्यात आली होती.
पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्या नेतृत्वाखाली तपास पथकाने तात्काळ कारवाई केली. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथके तयार करण्यात आली. गुप्त माहितीच्या आधारे आरोपी सातपूर भागातील असल्याचे समजताच पोलिसांनी त्या परिसरात शोधमोहीम सुरू केली. अथक परिश्रमानंतर पोलिसांनी चौघंना ताब्यात घेतले.
आरोपींनी सांगितले की भावना कदम (रा. वृंदावन नगर, म्हसरूळ) या शिक्षिकेने त्यांना दोन लाख रुपयांची सुपारी देऊन गगनची हत्या करण्यास सांगितले होते. भावना ही विवाहित असून, गगन तिचा प्रियकर होता.
प्राथमिक तपासात असे समोर आले आहे की भावना गगनच्या सतत होणाऱ्या त्रासाला कंटाळली होती. त्यामुळे तिने गगनचा काटा काढण्याचे ठरविले असावे असा अंदाज पोलीस व्यक्त करत आहेत.
या घटनेने नाशिक शहरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. एका शिक्षिकेने अशा प्रकारचे कृत्य केल्याने शिक्षण क्षेत्रातही खळबळ उडाली आहे. समाजातील नैतिक मूल्यांच्या ऱ्हासाबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे.
Reviewed by ANN news network
on
८/२५/२०२४ १२:१४:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: