दोन पोलिसांचा अपघाती मृत्यू; अपघात की घातपात?

 

पिंपरी : पिंपळे सौदागर आणि बोपोडी येथे ७ जुलै रोजी रात्री दोन अपघात झाले या अपघातात दोन पोलिसांचा मृत्यू झाला असून दोन्ही अपघात हिट अ‍ॅण्ड रन प्रकारातील असून धडक देणारी वाहने घटनास्थळावरून पसार झाली असल्याने हे अपघात आहेत की घातपात अशी चर्चा सुरू झाली आहे.

पिंपळे सौदागर येथे ७ जुलै रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास झालेल्या अपघातात पुणे येथे सीआयडीमध्ये काम करणार्‍या पोलिसाचा मृत्यू झाला आहे

रविवारी रात्री घडलेल्या या दुर्दैवी घटनेत सीआयडी (गुन्हे अन्वेषण विभाग) पुणे येथे कार्यरत असलेल्या सचिन विष्णू माने (वय 48, रा. आदित्य अपार्टमेंट, स्पाईन रोड, मोशी) यांचा अपघाती मृत्यू झाला. रात्री साडेदहा वाजता घडलेल्या या घटनेमुळे पोलीस दलात शोककळा पसरली आहे.

सचिन माने हे रात्री त्यांच्या मोपेड दुचाकीवरून कोकणे चौक ते नाशिक फाटा या दरम्यान जात होते. पिंपळे सौदागर येथील पिके चौकाजवळ अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत सचिन माने गंभीर जखमी झाले आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. या घटनेने स्थानिक लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि तपास सुरू केला. अपघात करणाऱ्या अज्ञात वाहनचालकाचा शोध घेण्यासाठी विविध पथके तयार करण्यात आली आहेत. तसेच, स्थानिक सीसीटीव्ही फुटेज तपासून संशयित वाहनाची ओळख पटवण्याचा प्रयत्न सुरू आहे.

सचिन माने यांच्या अपघाती मृत्यूने त्यांच्या कुटुंबियांसह संपूर्ण पोलीस दलावर शोककळा पसरली आहे. माने हे त्यांच्या सेवेत नेहमीच तत्पर आणि कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ओळखले जात होते. त्यांच्या अकाली निधनाने पोलीस दलात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

घटनेनंतर, उच्च पदस्थ पोलीस अधिकारी आणि स्थानिक नेत्यांनी माने यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली आणि त्यांचे सांत्वन केले.

तसेच, रविवारी मध्यरात्री पुणे पोलीस दलातील समाधान कोळी या पोलिस कॉन्स्टेबलचा मृत्यू झाला. जुन्या पुणे – मुंबई महामार्गावर हॅरिस पुलाच्या खाली रात्री पावणेदोन वाजता हा अपघात घडला. खडकी पोलिस ठाण्यात बीट मार्शल म्हणून काम करणारे समाधान कोळी आणि त्यांचा सहकारी दुचाकीवरुन गस्त घालत असताना, एका वेगाने आलेल्या चारचाकी वाहनाने त्यांना धडक दिली. या अपघातात समाधान कोळी यांचा जागीच मृत्यू झाला आणि त्यांचा सहकारी गंभीर जखमी झाला आहे.

या हिट अँड रन प्रकरणाची चौकशी खडकी पोलीस करत आहेत. वाहनचालक वाहनासह फरार झाला असून, त्याचा शोध घेण्यासाठी विविध पथके काम करत आहेत. एकाच दिवशी दोन पोलिसांचा हिट अ‍ॅण्ड रनमुळे मृत्यू झाल्याने पोलीस दलात संताप व्यक्त होत आहे.

या दोन दुर्दैवी घटनांमुळे पोलीस दलातील कार्यरत कर्मचार्‍यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.रस्त्यावर गस्त घालत असताना पोलिसांना असणारे धोके कमी करण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची गरज आहे. सचिन माने आणि समाधान कोळी यांच्या अपघाती निधनाने त्यांच्या कुटुंबीयांसह संपूर्ण पोलीस दलावर शोककळा पसरली आहे. या घटनांचा तपास लवकरात लवकर पूर्ण होऊन न्याय मिळावा, अशी अपेक्षा सर्वत्र व्यक्त होत आहे.

दोन पोलिसांचा अपघाती मृत्यू; अपघात की घातपात? दोन पोलिसांचा अपघाती मृत्यू; अपघात की घातपात? Reviewed by ANN news network on ७/०८/२०२४ ११:२१:०० AM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".