बोपोडी 'हिट अ‍ॅन्ड रन' प्रकरणातील आरोपी अटकेत

 


पुणे : बोपोडी येथील हॅरीसपुलाखाली ७ जुलै रोजी मध्यरात्री एका कारचालकाने दुचाकीवरून गस्त घालणार्‍या दोन पोलिसांना उडवले होते. या अपघातात एका पोलिसाचा जागीच मृत्यू झाला. तर, दुसरा पोलीस गंभीर जखमी झाला आहे. घटनास्थळावरून पसार झालेल्या कारचालकाला शोधून काढणे हे पोलिसांसमोर आव्हान होते. पोलिसांनी या प्रकरणी कसून तपास करत कारचालकाला अटक करण्यात यश मिळविले आहे.

सिध्दार्थ उर्फ गोट्या राजू केंगार (वय २४, रा. बोपोडी)  असे अटक करण्यात आलेल्या कारचालकाचे नाव असून  समाधान आनंदराव कोळी (वय ४४, रा. बोपोडी, मूळ रा. चोपडा, जळगाव) असे मृत पोलिसाचे नाव आहे. आणि, संजोग शाम शिंदे (वय ३५) असे जखमी पोलिसाचे नाव आहे.

अपघात घडण्यापूर्वी आरोपी केंगार याने अन्य तीन मित्रांसह दारूपार्टी केल्याची माहिती पोलीसतपासात पुढे आली आहे. आरोपीचा मित्र सिद्धार्थ लालबिगे याचा वाढदिवस होता. तो साजरा करण्यासाठी आरोपी सिद्धार्थ केंगार, रॉबिन आठवले, सिद्धार्थ लालबिगे आणि अन्य एकजण असे चौघे धानोरीतील पोरवाल रस्त्यावर असलेल्या एका हॉटेलमध्ये गेले. तेथे त्यांनी दारूपार्टी केली. त्यानंतर पुन्हा एका वाईन शॉपमधून दारू विकत घेऊन गाडीमध्येच प्यायली.मद्यधुंद झाल्यानंतर ते कार घेऊन बोपोडीकडे निघाले आरोपी सिद्धार्थ केंगार कार चालवत होता. या कारला अन्य एका कारने ओव्हरटेक केल्याने संतापलेल्या केंगार याने त्या कारला ओव्हरटेक करण्यासाठी बेभानपणे कार चालविण्यास सुरुवात केली.हॅरीसपुलाखाली पुढे जात असलेल्या पोलिसांच्या दुचाकीला या कारने मागून धडक दिली. या धडकेमुळे मागे बसलेले समाधान कोळी उंच उडून कारखाली आले. तर, संजोग शिंदे मोटारसायकलसह रस्त्याच्या बाजूस जाऊन पडले. या अपघातानंतर आरोपी केंगार याने कार न थांबवता तशीच पुढे दामटवली. त्यामुळे कोळी यांचा चिरडून मृत्यू झाला. अपघातानंतर आरोपी आणि कारमध्ये असलेल्या त्याच्या मित्रांनी घटनास्थळी न थांबता अथवा पोलिसांना न कळवता पळून गेले. हा प्रकार उघडकीस येऊ नये म्हणून कार दुसरीकडे लपवून ठेवून सर्वजण आपापल्या घरी जाऊन झोपले.

या रस्त्याने जाणार्‍या अन्य एका कारचालकाने या अपघाताची खबर पोलीस कंट्रोलरूमला दिली. त्यानंतर मरीआई गेट पोलीसठाण्याचे पोलीस तेथे पोहोचले. त्यांनी पुढील कार्यवाही केली.

बोपोडी 'हिट अ‍ॅन्ड रन' प्रकरणातील आरोपी अटकेत बोपोडी 'हिट अ‍ॅन्ड रन' प्रकरणातील आरोपी अटकेत Reviewed by ANN news network on ७/१०/२०२४ १२:१६:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".