पिंपरी: भारतीय जनता पक्षाच्या पुण्यात पार पडलेल्या राज्य अधिवेशनात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याविरोधात केलेल्या बेताल वक्तव्याचा निषेध करण्यासाठी पिंपरीत शिवसेनेने जोरदार आंदोलन केले. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात झालेल्या या आंदोलनात अमित शहांच्या प्रतिमेला जोडो मारो आंदोलन करून तीव्र विरोध दर्शवला.
मावळ लोकसभेचे संघटक आणि माजी महापौर संजोग वाघेरे पाटील यांनी या प्रसंगी बोलताना अमित शहांच्या वक्तव्याचा तीव्र शब्दांत निषेध केला. त्यांनी म्हटले की, "पुरोगामी महाराष्ट्रात येऊन उद्धव ठाकरे यांच्याविषयी अपशब्द वापरणे खपवून घेतले जाणार नाही." वाघेरे पाटील यांनी दावा केला की, महाराष्ट्रातील नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकांत भाजपला अपेक्षित यश न मिळाल्यामुळे अमित शहांनी निरर्थक व निंदनीय वक्तव्ये केली आहेत.
शिवसेना पुणे जिल्हा प्रमुख माजी आमदार गौतम चाबुकस्वार आणि माजी विरोधी पक्ष नेत्या सुलभा उबाळे यांनी देखील शहांच्या वक्तव्याचा निषेध नोंदवला. आंदोलनात युवासेना प्रमुख चेतन पवार, पिंपरी विधानसभा अध्यक्ष तुषार नवले, चिंचवड विधानसभा अध्यक्ष अनंत कोऱ्हाळे, उपशहर प्रमुख राजाराम कुदळे, पिंपरी विधानसभा महिला संघटिका डॉ. वैशाली कुलथे, चिंचवड विधानसभा उपशहर संघटिका ज्योती भालके, उपविभाग संघटिका तस्लिम शेख, नीता लोखंडे आणि इतर शिवसैनिक - पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वाघेरे पाटील यांनी स्पष्ट केले की, उद्धव ठाकरे यांना हिंदुत्व शिकविण्याची पात्रता अमित शहांमध्ये नाही. त्यांनी हिंदू-मुस्लिम सलोखा बिघडवण्याचे काम करू नये, असा इशारा दिला. शिवसेनेच्या या आंदोलनामुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण अधिक तापण्याची शक्यता आहे.
Reviewed by ANN news network
on
७/२४/२०२४ ०३:१०:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: