पुणे : पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यात सनसर येथे अॅन्टीकरप्शन खात्याच्या पथकाने २३ जुलै रोजी मंडल अधिकार्याला २०० रुपये लाच घेताना पकडले. या प्रकरणी वालचंदनगर पोलीसठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम, सन १९८८ चे कलम ७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ज्ञानोबा विश्वंभर कावळे, वय ५५ वर्षे,मंडल अधिकारी, सनसर मंडल अधिकारी कार्यालय, (अतिरिक्त कार्यभार लासुर्णे मंडल अधिकारी) ता. इंदापूर, जि. पुणे असे या अधिकार्याचे नाव आहे.
या प्रकरणी एका ५२ वर्षे वयाच्या व्यक्तीने अॅन्टीकरप्शनकडे तक्रार दिली आहे. त्याने आपल्या आईच्या नावे विभक्त शिधापत्रिका मागणीचा अर्ज सनसर येथील तलाठी यांच्याकडे दिला होता.तलाठ्याने स्वतंत्र शिधापत्रिका देण्याबाबत हरकत नसल्याचा अहवाल आरोपी ज्ञानोबा कावळे यांच्याकडे पाठविला.तक्रारदाराची आई वयोवृद्ध असल्यामुळे आईच्या परवानगीने तक्रारदार ज्ञानोबा कावळे यांना या कामासाठी भेटले असता, त्यांनी शिधापत्रीका देण्यास हरकत नसल्याबाबतचा अहवाल स्वाक्षरी करुन तहसिलदार कार्यालय, इंदापूर यांच्याकडे पाठविण्यासाठी २०० रुपये लाच मागितली. या प्रकरणी तक्रारदाराने अॅन्टीकरप्शनच्या पुणे कार्यालयाकडे तक्रार दिली.
अॅन्टीकरप्शनच्या अधिकार्यांनी पडताळणी केली असता कावळे यांनी २०० रुपये लाच मागितल्याचे त्यांना दिसून आले.अधिकार्यांनी सापळा रचून त्यांना रोजी सनसर मंडल अधिकारी कार्यालय येथे लाच घेताना 'रंगेहाथ' पकडले.
ही कारवाई पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अपर अधीक्षक डॉ. शीतल जानवे यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली.
Reviewed by ANN news network
on
७/२४/२०२४ ०४:०३:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: