पुणे, चिंचवड येथील क्लासेस अचानक बंद
पुणे: फिटजी कोचिंग क्लासने अचानक आपली पुणे आणि पिंपरी-चिंचवड केंद्रे बंद केली आहेत, ३०० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांकडून प्रति विद्यार्थी अडीच ते तीन लाख रुपये या प्रमाणे कोट्यवधी रुपये फी पोटी विद्यार्थ्यांकडून उकळून दोन्ही केंद्रे बंद करण्यात आली आहेत.
आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर काही पालकांनी चिंचवड पोलीसठाण्यात लेखी तक्रार दाखल केली आहे. राज्याच्या शिक्षण विभागाला पोलिसांनी ही घटना कळविली असून त्यांच्याकडून निर्देश आल्यानंतर पुढील कारवाई केली जाणार आहे.
फिटजीची स्वारगेट, पुणे आणि चिंचवड अशी दोन केंद्रे होती. यामध्ये आठवी ते बारावी अशा विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जात होता.त्याकरिता अडीच ते तीन लाख रुपये फी आकारली जात होती. या केंद्रांमध्ये सुमारे ३०० विद्यार्थी शिक्षण घेत होते.
मागील काही महिन्यांपासून या केंद्रांतील शिक्षक आणि अन्य कर्मचार्यांचे पगार नीट होत नव्हते. तसेच ज्या जागांमध्ये क्लास चालू होते त्यांचे भाडेही भरण्यात आले नव्हते. काही कर्मचार्यांनी काही पालकांना ही केंद्रे लवकरच बंद होण्याची शक्यता असल्याचे अनौपचारिकपणे सांगितल्याची माहिती काही पालकांनी दिली.
१९९२ मध्ये आयआयटी दिल्लीचे मेकॅनिकल इंजिनीअरिंग पदवीधर श्री. डी. के. गोयल यांनी या क्लासची सुरुवात केली. सध्या देशभरात या क्लासची सुमारे ६० केंद्रे असल्याचे समजते. फीटजी हाऊस, २९ -ए, कालू सराय, सर्वप्रिया विहार,(हौजखास बसटर्मिनल जवळ),
नवी दिल्ली-११००१६ या पत्त्यावर फिटजीचे मुख्यालय आहे. काही पालकांनी तेथे संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांना कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: