नवी दिल्ली : भारताचे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी आज ९ जून रोजी शपथ घेणार आहेत. सलग तिसर्यांदा देशाचे पंतप्रधान म्हणून शपथ घेणारे दुसरे पंतप्रधान आहेत. यापूर्वी पंडित जवाहरलाल नेहरू यांनी सलग ३ वेळा पंतप्रधानपद भूषविले होते. या विक्रमाची मोदी यांनी बरोबरी केली आहे.
शपथविधीसाठी उपस्थित राहण्याकरिता जगभरातील नेत्यांना निमंत्रणे धाडण्यात आली असून मॉरीशसचे पंतप्रधान प्रविंद जुगनाथ आणि मालदीवचे राष्ट्रपती मोहम्मद मुइज्जू, बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांचे नवी दिल्लीत आगमन झाले आहे. तर, श्रीलंकेचे राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे लवकरच नवी दिल्लीत दाखल होत आहेत.
नेपाळचे पंतप्रधान पुष्पकुमार दहल प्रचंड, आणि भूतानचे पंतप्रधान त्शेरिंग तोगबे यांनी या शपथविधीचे निमंत्रण स्वीकारले आहे. ते देखील लवकरच नवी दिल्लीत दाखल होणार आहेत.
या शपथविधीमध्ये सहभागी होण्याव्यतिरिक्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी याच दिवशी संध्याकाळी आयोजित केलेल्या मेजवानी समारंभात देखील हे नेते उपस्थित राहणार आहेत.
शेजाऱ्यांना प्राधान्य हे धोरण आणि सागर हा दृष्टीकोन यांना भारताने दिलेले प्राधान्य विचारात घेऊन हे सर्व नेते, नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधानपदाच्या सलग तिसऱ्या कार्यकाळाच्या शपथविधीला उपस्थित राहणार आहेत.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: