नवी दिल्ली : आज ९ जून रोजी नरेंद्र मोदी यांचा भारताचे पंतप्रधान म्हणून शपथविधी होत आहे. शेजारील मॉरीशस, बांगलादेश श्रीलंका, मालदीव यांचे राष्ट्रप्रमुख नवी दिल्लीत दाखल झाले आहेत. आता चर्चा आहे ती नव्या मंत्रिमंडळात कोणाचा समावेश असणार याची.
राजकीय वर्तुळाचा कानोसा घेता नव्या सरकारमध्ये राजनाथसिंह, नितीन गडकरी यांचा समावेश निश्चित झाला असल्याचे समजते. चंद्राबाबू नायडूंच्या पक्षाचे दोन मंत्रिमंडळात असणार आहेत. टीडीपीचे खासदार जयदेव गल्ला यांनी एक्सवर केलेल्या पोस्टनुसार पक्षाचे खासदार राममोहन नायडू कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतील आणि दुसरे खासदार चंद्रशेखर पेम्मासानी यांना नवीन मंत्रालयात राज्यमंत्री केले जाईल. एनडीए मधील आणखी एक महत्त्वाचा पक्ष जेडीयूच्या रामनाथ ठाकूर यांना मोदी 3.0 कॅबिनेटमध्ये प्रतिनिधित्व दिले जाणार आहे.राष्ट्रीय लोक दलाचे नेते जयंत चौधरी, अपना दल (सोनेलाल) च्या अनुप्रिया पटेल आणि हिंदुस्थानी अवाम मोर्चाचे जीतनराम मांझी यांचा नवीन मंत्रिमंडळात समावेश असणार आहे. कर्नाटकचे भाजप नेते बसवराज बोम्मई यांचाही मंत्रिमंडळात समावेश होणार असल्याचे समजते.
दरम्यान सायंकाळी सव्वासात वाजता होणार्या या शपथविधीसाठी भारताच्या शेजारील आणि हिंदी महासागर क्षेत्रातील प्रमुख मान्यवर आणि विशेष निमंत्रित उपस्थित राहणार असून काही राष्ट्रप्रमुख नवी दिल्लीत दाखलही झाले आहेत.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: