श्रीराम मंदिरानंतर आता ‘हिंदुराष्ट्रा’साठी संघटित प्रयत्न आवश्यक!: पराग गोखले

 


उद्यापासून गोव्यात ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सव’!

   पुणे :  हिंदु राष्ट्रस्थापनेच्या कार्याला गती देण्यासाठी प्रतीवर्षीप्रमाणे यंदाही बारावे ‘अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन’ अर्थात् ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले आहे. हा महोत्सव २४ ते ३० जून २०२४ या कालावधीत ‘श्री रामनाथ देवस्थान’, फोंडा, गोवा येथे होणार आहे, असे हिंदु जनजागृती समितीचे श्री. पराग गोखले यांनी सांगितले. 

५०० वर्षांच्या संघर्षानंतर अयोध्येत उभे राहिलेले प्रभु श्रीरामाचे मंदिर हे हिंदु राष्ट्र निर्मितीच्या दिशेने पडलेले पहिले पाऊल आहे, असे आम्ही मानतो; मात्र लोकसभा निवडणुकीनंतरची देशातील परिस्थिती पहाता हिंदूंच्या समस्या सोडवण्यासाठी हिंदूंची इकोसिस्टम निर्माण करून नियोजनबद्ध पद्धतीने कार्य करण्याची आवश्यकता आहे. असेही गोखले म्हणाले. 

वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते. ते म्हणाले,  या निवडणुकीच्या काळात जाहीर झालेल्या अहवालावरून स्पष्ट झाले की, भारताच्या स्वातंत्र्यानंतर १९५० ते २०१५ या ६५ वर्षांच्या काळात हिंदूंची लोकसंख्या सुमारे ८ टक्क्यांनी कमी झाली आहे, तर त्या तुलनेत याच कालावधीत अल्पसंख्यांकांची लोकसंख्या सुमारे ४३.१५ टक्क्यांनी वाढली आहे. ही वाढ अनैसर्गिक म्हणावी लागेल; कारण भारतात अवैध बांगलादेशी तसेच रोहिंग्या घुसखोरांची संख्या वाढत चालली आहे. त्यांना पासपोर्ट, आधारकार्ड, पॅनकार्ड यांसारखी भारतीय नागरिकत्वाची ओळखपत्रे बनवून देणार्‍यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला पाहिजे. या वर्षी तर निवडणुकांमध्येही बांगलादेशी घुसखोरांनी मतदान केल्याच्या घटना उघड झाल्या आहेत. मुंबईत अशा काही घुसखोरांना पोलिसांनी अटक केली आहे. या अवैध घुसखोरांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे मतदान करणे, हे भारताच्या लोकशाहीला धोका निर्माण करणारे आहे. त्यामुळे २०११ नंतर २०२१ मध्ये जनगणना न झाल्याने मागील १३ वर्षांत भारताच्या जनसंख्येत काय पालट झाले, ते त्वरीत जनगणना करून जनतेच्या पुढे मांडण्याची आवश्यकता आहे. तसेच CAA आणि NRC संपूर्ण भारतात त्वरीत लागू केले पाहिजे.

    देशाच्या सुरक्षिततेचा विचार केला तर, माता वैष्णोदेवीला जाणार्‍या भक्तांच्या बसवरील आतंकवादी हल्ल्यावरून समोर आले आहे की, काश्मीरमधील आतंकवाद आता हळूहळू हिंदुबहुल जम्मूच्या दिशेने सरकत आहे.  पंजाबमधील खलिस्तानवादी चळवळीसह राष्ट्रविरोधी आणि विदेशी शक्ती भारताला अस्थिर करण्यासाठी जोमाने सक्रीय झाल्या आहेत. भारतासह जगभरातील हिंदूंवरील हल्ले वाढले आहेत. अशा वेळी हिंदूंना जातीपातीच्या भांडणांत गुंतवून त्यांच्यात फूट पाडण्याचे षड्यंत्र आखले जात आहे; मात्र हिंदु राष्ट्राच्या मार्गात असे कितीही अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न केला, तरी हिंदूंच्या संघटनामुळे विरोधकांची षड्यंत्रे यशस्वी होणार नाहीत. जागतिक स्तरावर विविध देशांमधील वाढत जाणारी युद्धे-अस्थिरता पाहता हिंदु धर्म हा एकमात्र धर्म आहे की, जो विश्वबंधुत्वाची आणि ‘वसुधैव कुटुंबकम’ची संकल्पना मांडून सर्व समाजाला जोडू शकतो अन् एकसंघ ठेवू शकतो.

  यंदाच्या अधिवेशनामध्ये हिंदु राष्ट्राशी संबंधित विविध विषयांवर तज्ञ मान्यवरांचे परिसंवाद, तसेच प्रत्यक्ष समान कृती कार्यक्रम निश्चित करण्यासाठी गटचर्चा असतील. ‘सनातन धर्माची वैचारिक सुरक्षा’, ‘धर्म आणि राष्ट्रविरोधी नॅरेटीव्हला प्रत्युत्तर’, ‘हिंदु समाजाच्या रक्षणाचे उपाय’, ‘हिंदु राष्ट्रासाठी संवैधानिक प्रयत्न’, ‘मंदिर संस्कृतीच्या रक्षणाचे उपाय’, ‘वैश्विक स्तरावर हिंदुत्वाचे रक्षण’, ‘देशाच्या अर्थव्यवस्थेला आव्हान देणार्‍या हलाल अर्थव्यवस्थेवर उपाय’, ‘लँड जिहाद’, ‘काशी-मथुरा मुक्ती’, ‘गड-किल्ल्यांवरील अतिक्रमणे’ यांसारख्या विविध विषयांसोबतच हिंदु राष्ट्राच्या पायाभरणीसाठी आवश्यक विविध विषयांवर या महोत्सवामध्ये विचारमंथन होणार आहे.  


पुणे जिल्ह्यांतील १५ विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे एकूण ५० पेक्षा अधिक प्रतिनिधी ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’त सहभागी होणार !


   या अधिवेशनाला अमेरिका, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, घाना, नेपाळ आणि बांग्लादेश या देशांतून प्रतिनिधी येणार आहेत. या देशांसह भारतातील २६ राज्यांतील १००० हून अधिक हिंदु संघटनांच्या २००० हून अधिक प्रतिनिधींना निमंत्रित करण्यात आले आहे. यात प्रामुख्याने भारतभरातील विविध संप्रदायाच्या संतांची वंदनीय उपस्थितीही या अधिवेशनाला लाभणार आहे. याशिवाय प्रामुख्याने जय शंकर प्रतिष्ठान, पुणेचे संस्थापक अध्यक्ष सुरेश (पप्पाजी) पुराणिक, श्री ब्रम्हांड नायक स्वामी समर्थ अध्यात्मिक सेवा संस्था, पुणेचे श्री. विठ्ठल गजानन धर्माधिकारी, स्वातंत्र्यवीर सावरकर युवा विचार मंच, पुणेचे अध्यक्ष डॉ. नीलेश लोणकर यांच्यासह १० वरिष्ठ अधिवक्ता, उद्योजक, विचारवंत, लेखक, २० पेक्षा अधिक मंदिर विश्वस्त, तसेच समविचारी सामाजिक, राष्ट्रीय आणि आध्यात्मिक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित रहाणार आहेत. तसेच भाजपचे पूर्व सचिव श्री. गिरीश खत्री, व्यापारी एवं ग्राहक संघ, पुणेचे अध्यक्ष श्री. विजय नरेला, प्रतिसाद कम्युनिकेशन्स प्रा. लि.चे मॅनेजिंग डायरेक्टर श्री. अभिजित जोग, सेवानिवृत्त प्रधान जिल्हा न्यायाधीश श्री. दिलीप माणिकराव देशमुख, ज्येष्ठ अभिनेता श्री राहुल सोलापूरकर, महाराष्ट्र गो सेवा आयोगाचे अध्यक्ष श्री. शेखर मुंदडा आदी मान्यवरांसह पुणे जिल्ह्यांतील १५ पेक्षा अधिक विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे एकूण ५० हून अधिक प्रतिनिधीही या महोत्सवाला उपस्थित रहाणार आहेत, पराग गोखले यांनी ही माहिती दिली.

      या अधिवेशनाचे थेट प्रक्षेपण हिंदु जनजागृती समितीचे संकेतस्थळ  HinduJagruti.org याद्वारे, तसेच समितीच्या ‘HinduJagruti’ या ‘यु-ट्यूब’ चॅनेल आणि facebook.com/hjshindi1 या ‘फेसबुक’द्वारेही केले जाणार आहे. जगभरातील हिंदुत्वनिष्ठांनी या ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’चा लाभ घ्यावा, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

श्रीराम मंदिरानंतर आता ‘हिंदुराष्ट्रा’साठी संघटित प्रयत्न आवश्यक!: पराग गोखले श्रीराम मंदिरानंतर आता ‘हिंदुराष्ट्रा’साठी संघटित प्रयत्न आवश्यक!: पराग गोखले Reviewed by ANN news network on ६/२३/२०२४ ०१:१८:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".