ट्रम्प यांचे आश्चर्यचकित करणारे वक्तव्य
अमेरिकेत लवकरच निवडणुका होणार आहेत. या पार्श्वभूमिवर अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेले एक विधान सगळ्यांना आश्चर्यचकित करणारे आहे. एकेकाळी राष्ट्राध्यक्ष असताना 'अमेरिका फर्स्ट' अशी घोषणा देत सर्वत्र अमेरिकांना प्राधान्य देण्याचा मनोदय व्यक्त करणारे ट्रम्प यांनी भारतातून अमेरिकेत येऊन शिकून परत भारतात जाणार्या विद्यार्थ्यांना ग्रीनकार्ड देऊन अमेरिकेतच राहण्यास प्रवृत्त करणार असल्याचे म्हटले आहे. यामुळे अमेरिकन राजकीय नेते आश्चर्यचकित झाले आहेत.
ट्रम्प यांनी नुकतीच एका प्रसारमाध्यमाला मुलाखत दिली. त्यात ते म्हणाले की, भारतीय विद्यार्थी अमेरिकन विद्यापीठांमध्ये शिकतात आणि येथे अनुभव आणि ज्ञान मिळवतात आणि नंतर भारतात परत जातात आणि करोडपती आणि अब्जाधीश होतात. ही एकप्रकारे ज्ञानसंपन्न लोकांची गळती आहे. त्यामुळे या भारतीयांच्या ज्ञानाचा आणि अनुभवाचा अमेरिकेला उपयोग व्हावा म्हणून त्यांना अमेरिकेतच राहण्यास प्रवृत करणे आवश्यक आहे. त्यासाठीचा सर्वात उत्तम मार्ग म्हणजे या विद्यार्थ्यांना पदवीबरोबरच ग्रीनकार्ड देणे हा आहे. यामुळे ते अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेत योगदान देत राहतील आणि त्यांची भारतात परत जाण्याची शक्यता कमी होईल.
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्यांचे योगदान
उत्तम ज्ञान मिळविण्यासाठी भारतीय विद्यार्थी अमेरिकेत जातात. तेथील विद्यापीठांमध्ये ते उत्कृष्ट कामगिरी करतात.ते केवळ त्यांच्या अभ्यासात अव्वलच राहत नाहीत तर संशोधन आणि नाविन्यपूर्ण कार्यातही आघाडीची भूमिका बजावतात.अमेरिकन कंपन्यांमध्ये भारतीय महत्त्वाच्या पदांवर आहेत आणि देशाच्या अर्थव्यवस्थेत त्यांचे मोठे योगदान आहे. ते उच्च पगार मिळवतात आणि तंत्रज्ञान, आरोग्यसेवा आणि वित्त यांसारख्या क्षेत्रात प्रमुख भूमिका बजावतात.सुंदर पिचाई (Google चे CEO) आणि सत्या नडेला (Microsoft चे CEO) ही भारतीय प्रतिभेची प्रमुख उदाहरणे आहेत ज्यांनी अमेरिकन अर्थव्यवस्थेत महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. त्यांचे यश भारतीय विद्यार्थ्यांना प्रेरणा देते ही वस्तुस्थिती आहे.
भारतात का परततात?
मात्र शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांना अमेरिकेत राहण्यासाठी आवश्यक असणारे ग्रीनकार्ड मात्र लवकर मिळत नाही. अमेरिकेचे याबाबतचे धोरण थोडे कडक असल्याने अनेक विद्यार्थी भारतात परततात. त्यांना चांगल्या पगाराच्या नोकर्या मिळतात. किंवा ते स्वतःचे व्यवसाय उभारून चांगला पैसा कमावतात. निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर ट्रम्प यांना या वास्तवाची जाणीव झाली आहे. त्यामुळे त्यांनी वरील मत व्यक्त केले आहे.
परत येणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांचे फायदे
भारतीय विद्यार्थी जेव्हा त्यांचा अभ्यास पूर्ण करून परततात तेव्हा ते त्यांच्या ज्ञानाचा आणि अनुभवाचा उपयोग येथील कंपन्यांमध्ये योगदान देण्यासाठी करतात. याचा फायदा भारतीय अर्थव्यवस्थेलाही होतो.
भारतीय अर्थव्यवस्थेत तेजी
भारताची अर्थव्यवस्था झपाट्याने वाढत आहे आणि येथील विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय अनुभव मिळवून परत येण्याची आणि स्वतःच्या कंपन्या सुरू करण्याची संधी मिळते. त्यामुळे रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होतात.
स्टार्टअप संस्कृती आणि रोजगाराच्या संधी
भारतात स्टार्टअप संस्कृती झपाट्याने वाढत आहे. अमेरिकन शिक्षण घेणारे विद्यार्थी स्वत:चे स्टार्टअप सुरू करून देशात रोजगाराच्या नवीन संधी निर्माण करत आहेत.
ट्रम्प यांची ही योजना भारतीय विद्यार्थ्यांना भारतात परत येण्यापासून रोखण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल ठरू शकते. यामुळे अमेरिकन कंपन्यांना उत्तम भारतीय प्रतिभा मिळेल आणि त्याचा फायदा अमेरिकन अर्थव्यवस्थेला होईल. अमेरिकन कंपन्यांना भारतीय टॅलेंटची गरज आहे. भारतीय विद्यार्थी आपल्या मेहनतीने आणि क्षमतेने येथील कंपन्यांमध्ये उच्च पदांवर पोहोचतात आणि कंपन्यांच्या वाढीत महत्त्वाची भूमिका बजावतात.
भारतीय प्रतिभेचे अमेरिकेत आकर्षण
अमेरिकेला भारतीय प्रतिभेला आकर्षित करायचे आहे कारण ते त्यांच्या देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी फायदेशीर आहे. भारतीय विद्यार्थी येथे केवळ अभ्यासासाठी येत नाहीत तर नोकरी करूनही योगदान देतात.
युरोप आणि कॅनडाशी स्पर्धा
अमेरिकेशिवाय सध्या युरोप आणि कॅनडा हे देशही भारतीय टॅलेंटला आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहेत.
भारतीय अमेरिकेत का राहू पहातात?
उच्च शिक्षणाचा दर्जा, संशोधनाच्या संधींचा अभाव, पायाभूत सुविधांच्या समस्या यासारखी अनेक आव्हाने भारतीय शिक्षण व्यवस्थेमध्ये आहेत. यामुळे विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षण घेण्याची प्रेरणा मिळते.
परदेशात उच्च शिक्षण घेणे महाग आहे, परंतु त्याचे बरेच फायदे देखील आहेत. विद्यार्थ्यांना प्रगत तंत्रज्ञान आणि संशोधनाच्या संधी मिळतात ज्यामुळे त्यांच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक वाढीस मदत होते.
भारतातील भ्रष्टाचार, राजकीय वातावरण, सामाजिक ताणतणाव आणि महत्त्वाचे म्हणजे सुखाने जीवन जगण्यात येणार्या अडचणी यामुळे अमेरिकेत उच्चशिक्षण घेऊन तेथेच स्थायिक होण्यासाठी प्रयत्न करणार्यांची संख्या अधिक आहे.
मात्र, तरीही पुन्हा भारतात परतणार्यांची संख्या सध्या वाढू लागली असून भविष्यातील 'ब्रेनड्रेन'चा धोका ट्रम्प यांनी वेळीच ओळखला आहे. त्यामुळे त्यांनी हे मत मांडले आहे.
अमेरिकेतील निवडणूकपूर्व चर्चेचे विषय असे देशहिताचे आहेत. त्या उलट आपल्याकडे काय चालते ते नजरेसमोर आणले तर अमेरिकेत स्थायिक होण्याची इच्छा अनेक भारतीय का बाळगतात ते स्पष्ट होते.
Reviewed by ANN news network
on
६/२३/२०२४ १२:५२:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: