९३ दशलक्ष शेतकर्यांसाठी २० हजार कोटी रुपयांचे वाटप
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज १० जून रोजी पंतप्रधानपदाच्या आपल्या तिसर्या कारकिर्दीत पंतप्रधान पदाचा कार्यभार स्वीकारला.त्यानंतर त्यांनी देशातील ९३ दशलक्ष शेतकर्यांना पीएम किसाननिधीचा १७ वा हप्ता वाटपाच्या निर्णयावर स्वाक्षरी केली. यामुळे २० हजार कोटी रुपये देशातील ९३ दशलक्ष शेतकर्यांना वाटले जाणार आहेत.
“शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी आमचे सरकार पूर्णपणे वचनबद्ध आहे. त्यामुळे पदभार स्वीकारल्यानंतर स्वाक्षरी केलेली पहिली फाईल शेतकरी कल्याणाशी संबंधित आहे, असे मोदींनी केलेल्या निवेदनात म्हटले आहे.
मोदींनी २८ फेब्रुवारी रोजी पीएम-किसान या गरीब शेतकऱ्यांसाठी रोख हस्तांतरण योजनेचा १६ वा हप्ता जारी केला होता.
१५ व्या हप्त्यात, मोदींनी थेट लाभ हस्तांतरणाद्वारे ८० दशलक्ष शेतकऱ्यांना जवळपास १८ हजार कोटी वितरित केले होते.
पीएम किसान योजनेअंतर्गत, सरकार वैध नावनोंदणी असलेल्या शेतकऱ्यांना वर्षाला ६ हजार रुपये मदत पुरवते. ही रक्कम २ हजार रुपयांच्या तीन समान हप्त्यात शेतकर्यांच्या खात्यात जमा केली जाते. २४ फेब्रुवारी २०१९ रोजी कल्याणकारी ही योजना सुरू करण्यात आली आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: