विजयवाडा : टीडीपीचे अध्यक्ष एन चंद्राबाबू नायडू यांची मंगळवारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (एनडीए) नेतेपदी एकमताने निवड करण्यात आली. विजयवाडा येथील कन्व्हेन्शन सेंटरमध्ये झालेल्या एनडीएच्या बैठकीत जनसेना प्रमुख पवन कल्याण यांनी नायडू यांच्या नावाचा मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार म्हणून प्रस्ताव मांडला आणि त्याला भाजपच्या प्रदेशाध्यक्ष डी पुरंदेश्वरी यांनी पाठिंबा दिला.
मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार म्हणून त्यांचे नाव प्रस्तावित केल्यानंतर, नायडू म्हणाले की अमरावती ही आंध्रप्रदेशची राजधानी राहील आणि एनडीए सरकार विशाखापट्टणम आणि कुर्नूलचा विकास करेल.
तीन आघाडीच्या सर्व आमदारांनी नायडू यांची नेता म्हणून निवड करण्याचा एकमताने ठराव मंजूर केला. हा ठराव राज्यपाल न्यायमूर्ती अब्दुल नझीर यांच्याकडे पाठवून सरकार स्थापन करण्याची इच्छा व्यक्त केली. राज्यपालांनी एनडीएला सरकार स्थापनेसाठी औपचारिक निमंत्रण दिले आणि यासंदर्भात अधिसूचना जारी करण्यात आली आहे. नायडू उद्या बुधवारी आंध्रप्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. नायडू आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांच्या शपथविधीला पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि एनडीएचे इतर नेते उपस्थित राहणार आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: