जगातील सर्वात मोठ्या सुपारी उत्पादक भारतात होतेय सुपारीचे स्मगलिंग
मुंबई : न्हावा शेवा येथे असलेल्या जवाहरलाल नेहरू कस्टम हाऊसमध्ये डांबराच्या नावाखाली आयात करण्यात आलेली ११२ मेट्रिक टन सुपारी एसआयआयबी अर्थात विशेष गुप्तचर आणि तपास शाखेच्या अधिकाऱ्यांनी जप्त केली आहे.या सुपारीची किंमत सुमारे ५.७ कोटी रुपये आहे. या प्रकरणात ६.२७ कोटी रुपयांची करचुकवेगिरी करण्यात आली आहे.
१० कंटेनरमधून ही ११२.१४ मेट्रिक टन सुपारी आणण्यात आली होती.आयातीसंबंधित कागदपत्रात या कंटेनरमधील पिंपात बिटुमेन अर्थात डांबर असल्याचे म्हटले होते.
वास्तविक भारत हा जगातील सर्वात मोठा सुपारी उत्पादक देश आहे. परंतु देशातील अवैध गुटखा उद्योगासाठी मोठ्या प्रमाणात सुपारीची तस्करी केली जाते.
या प्रकरणात आयात करण्यात आलेल्या कंटेनर्समध्ये ड्रम्स होते.त्यात डांबर असल्याचे भासविण्यात आले होते.विदेशी पुरवठादाराने यासाठी संपूर्ण नियोजन आणि अंमलबजावणी केल्याचे यावरून दिसून येते. हे सुसंघटित आंतरराष्ट्रीय तस्करी जाळ्याचे द्योतक आहे. त्याचा छडा लावण्यासाठी एसआयआयबीच्या (आयात) पथकाने अथक परिश्रम घेतले. जवाहरलाल नेहरू बंदर, न्हावा शेवा येथे तस्करीला आळा घालण्यासाठी हे पथक कार्यरत आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: