पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या रुपाली चाकणकर यांनी खडकवासला विधानसभा मतदारसंघातील मतदानकेंद्रात मतदानाच्या दिवशी ७ मे रोजी ईव्हीएमची पूजा केली होती. त्या प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला असून ज्या मतदान क्रेंद्रात त्यांनी ईव्हीएमची पूजा केली त्या तेथील अधिकारी, कर्मचार्यांवर शिस्तभंगाच्या कारवाईची टांगती तलवार आहे.जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी या कर्मचार्यांना कारणे दाखवा नोटीसा दिल्या असल्याचे वृत्त आहे.
रुपाली चाकणकर यांनी ७ मे रोजी वडगाव धायरी परिसरातील नारायणराव सणस मतदान केंद्रावर मतदान सुरू होण्यापूर्वी ईव्हीएम मशीनची पूजा केली होती. याचे फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. हा प्रकार मतदान केंद्राधिकार्याने वरिष्ठांना कळविला होता. त्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी कविता द्विवेदी यांच्या सूचनेप्रमाणे या प्रकरणी सिंहगडरोड पोलीसठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. द्विवेदी यांनी त्या मतदानकेंद्रातील अधिकारी आणि कर्मचार्यांविरोधात शिस्तभंगाची कारवाई करणे सयुक्तिक राहील असा अहवाल जिल्हाधिकार्यांकडे पाठविला. त्यामुळे आता या कर्मचार्यांविरोधात खातेनिहाय चौकशीची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून त्याची प्राथमिक पायरी म्हणून त्यांना कारणे दाखवा नोटीसा देण्यात आल्या असल्याचे समजते.
सध्या या प्रकरणाची चर्चा जिल्हाधिकारी कार्यालयासह सर्व प्रशासकीय कार्यालयात सुरू आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: