नवी दिल्ली : कुवेत येथे मंगफ या भागात १२ जून रोजी पहाटे एका इमारतीला भीषण आग लागून या आगीत ४९ व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. यामध्ये ४० हून अधिक भारतीय नागरिकांचा समावेश असून त्यातील बहुतांश केरळचे रहिवासी असल्याचे समजते. हे सर्व नोकरीधंद्याच्या निमित्ताने कुवेत येथे वास्तव्य करत होते. या खेरीज अनेक भारतीय नागरिक जखमी झाले असल्याचे वृत्त आहे. पंतप्रधान मोदी यांनी यादुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला असून मृतंच्या नातेवाईकांना २ लाख आणि जखमींना ५० हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे. कुवेतमधील भारतीय दूतावासाला परिस्थितीवर लक्ष ठेवावे आणि बाधितांना मदत करावी असे निर्देश दिले आहेत.
भारतीय राजदूतांनी घटनास्थळी आणि जखमी दाखल असलेल्या रुग्णालयाला भेट दिली आहे. भारत सरकारचे एक राज्यमंत्री आज कुवेतला रवाना होणार असून ते परिस्थितीवर नियंत्रण ठेवतील.
४० भारतीय कामगार आगीत ठार झाल्याची माहिती कुवेतच्या शासनयंत्रणेने दिली आहे. सुमारे ३० जखमी भारतीयांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या संदर्भात, भारत सरकारने एक नियंत्रण कक्ष देखील स्थापन केला आहे. हेल्पलाइन क्रमांक देखील जारी करण्यात आले आहेत. मृत आणि जखमींची ओळख प्रक्रिया सुरू आहे. मृत भारतीयांचे मृतदेह लवकरच भारतात परत पाठवले जातील.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: