डोक्यात लोखंडी रॉडने प्रहार करून १ लाख ५७ हजार रुपये पळवले! गिरडा घाटात घडली घटना
दिलीप शिंदे
सोयगाव : धनिक मायक्रोफायनान्सच्या वसुली कर्मचाऱ्यांना गिरडा घाटात दरोडेखोरांनी एक लाख ५७ हजार रु ची रक्कम लुटून मारहाण केल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. १० जूनच्या रात्री १० वाजेच्या सुमारास ही घटना घडली. घटनास्थळ गिरडा गावापासून ६ ते ७ किलोमिटर अंतरावर असून सोयगाव तालुक्यातील फर्दापूर पोलीस स्टेशन अंतर्गत येते. याप्रकरणी फर्दापूर पोलीस ठाण्यात मंगळवारी सायंकाळी चार वाजता अज्ञात चार ते पाच दरोडेखोरांविरुद्ध दरोड्यांचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे..
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पंजाब थिगळे, धीरज शातम आणि संघानंद इंगळे हे धनिक मायक्रोफायनान्स चे कर्मचारी सोमवारी १० जून रोजी सोयगाव तालुक्यात कर्ज वसुलीसाठी गेले होते. रात्री बुलडाणा येथे परत येत असताना त्यांना उशीर झाला. तिघे दोन मोटरसायलने बुलडाण्याकडे येत होते.दरम्यान टिटवी येथून काही जणांकडून कर्ज वसूल करून तिघे गिरडा घाट चढून वर येत होते. त्याचवेळी घाटातील महादेव मंदिराजवळ दबा धरून बसलेल्या ४ ते ५ जणांनी तिघांवर एकाकाकी हल्ला चढवला. हल्लेखोरांजवळ लोखंडी रॉड होते.
या हल्ल्यात धीरज शांतम गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर बुलडाण्यात उपचार सुरू आहेत. कर्जवसुली करून आणलेली पैशांची एक बॅग पंजाब थिगळे यांच्याजवळ होती, त्यामुळे पंजाब थिगळे यांनी दरोडेखोरांच्या तावडीतून निसटून जंगलात पळ काढला, त्यामुळे दरोडेखोरांनी थिगळे यांचा पाठलाग केला आणि पैशांची बॅग आणि मोबाईल हिसकावून दरोडेखोर पसार झाले.
यानंतर थिगळे यांनी रात्रीच्या अंधारात जंगलातून पायी प्रवास करीत सोयगाव तालुक्यातील पिंपळवाडी गाव गाठले. तिथून स्थानिकांच्या मदतीने धनिक मायक्रोफायनान्सच्या वरिष्ठांना या घटनेची माहिती दिली. त्यानंतर तिघाही कर्मचाऱ्यांना बुलडाण्यात उपचारासाठी आणण्यात आले. बुलडाणा पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली मात्र बुलडाणा पोलीस घटनास्थळी पोहचल्यानंतर घटनास्थळ हे बुलडाणा आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या सीमेवर असून ते सोयगाव तालुक्यातील फर्दापूर पोलीस स्टेशन अंतर्गत येत असल्याचे समोर आले. याप्रकरणी फर्दापूर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून मंगळवारी सायंकाळी चार वाजता अज्ञात चार ते पाच दरोडेखोरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलीस निरीक्षक पंकज साबळे उपनिरीक्षक सुग्रीव चाटे, कविता कुलथे ,जमादार नीलेश लोखंडे आदी तपास करत आहे...
धनिक मायक्रोफायनान्सच्या ३ वसुली कर्मचाऱ्यांना दरोडेखोरांनी लुटले
Reviewed by ANN news network
on
६/१२/२०२४ ०८:४६:०० AM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: