फायनान्सवाल्यांची मुजोरी जिरवण्यासाठी वळले गुन्हेगारीकडे! तरुणांनी रस्त्यात अडवून लुटले, बेदम चोपलेही

 


गिरडा घाटात नक्की काय घडलं वाचा...

दिलीप शिंदे 

सोयगाव  :  सध्या मायक्रोफायनान्स कंपन्यांनी ग्रामीण भागातील अनेकांना आपल्या जाळ्यात ओढले आहे. कमी व्याजदाराचे आमिष दाखवून आर्थिक निकड भागविण्याच्या नावाखाली कर्ज देऊ केल्यानंतर अव्वाच्या सव्वा व्याजवसुली सुरू आहे. सोबतच गावात धमकावण्याचे प्रकारही घडतात, बदनामी केली जात आहे. याचा रोष टिटवीमध्ये उफाळून आला. तरुणांनी एकत्र येऊन फायनान्सवाल्यांची गुर्मी उतरविण्यासाठी कायदा हातात घेतला. मात्र यामुळे आता त्‍यांचे भवितव्य अंधारात सापडले आहे. तिघा मुजोर फायनान्सवाल्यांना धडा शिकवण्यासाठी तरुणांनी त्‍यांना गिरडा घाटात अडवून बेदम मारहाण करत वसूल केलेली १ लाख ५७ हजार रुपयांची रक्‍कम लुटून नेली. फर्दापूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रफुल्ल साबळे व सहकाऱ्यांनी तातडीने या प्रकरणात कारवाई करत भरत बन्सीलाल चव्हाण वय ३४ वर्षे रा.देव्हारी ता. सोयगाव, शुभम बाळू सुरडकर वय २१ वर्षे रा.टिटवी ता.सोयगाव जि.छत्रपती संभाजीनगर,मुकेश संजय पवार वय २५ वर्षे रा. गोतमारा ता.मोताळा जि.बुलढाणा या तिघांना दि.११ मंगळवारी रात्री अटक केली. तर संजय प्रभाकर कांडेलकर वय २१ वर्षे , किरण अरुण सपकाळ वय २३ वर्षे, अक्षय उर्फ अमोल प्रकाश जाधव वय २१ वर्षे तिन्ही रा. गोतमारा ता.मोताळा जि.बुलढाणा या तिघांना दि.१२ बुधवारी दुपारी अटक करण्यात आली. सहाही आरोपींना बुधवारी  सिल्लोड येथील न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने सहाही  आरोपींना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

नक्की काय झाले?
धनिक मायक्रोफायनान्सच्या वसुली कर्मचाऱ्यांना गिरडा घाटात लुटून बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना सोमवारी (१० जून) रात्री दहाच्या सुमारास घटना घडली. घटनास्थळ गिरडा गावापासून ६ ते ७ किलोमीटर अंतरावरील  छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यातील फर्दापूर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येते. पंजाब शेषराव थिगळे, धीरज शांतम आणि सदानंद इंगळे हे धनिक मायक्रोफायनान्सचे सोयगाव तालुक्यात कर्जवसुलीसाठी गेले होते. रात्री बुलडाणा येथे परतताना त्यांना उशीर झाला. तिघे दोन मोटरसायकलीने बुलडाण्याकडे येत असताना टिटवी येथून काही जणांकडून कर्ज वसूल करून ते गिरडा घाट चढून वर येत होते. त्याचवेळी घाटातील महादेव मंदिराजवळ दबा धरून बसलेल्या ५ ते ६ जणांनी तिघांवर हल्ला चढवला. लोखंडी रॉडने तिघांना बेदम मारहाण करण्यात आली.

संताप का वाढला...
या प्रकरणाचा तपास फर्दापूर पोलीस करत असताना त्‍यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, हा गुन्हा शुभम बाळू सुरडकर (रा. टिटवी) याने केला आहे. पोलिसांनी तातडीने टिटवी गाठून शुभमला ताब्‍यात घेतले. त्‍याच्यात अन्‌ संजय कांडेलकर यांनी एकमेकाना कॉल केलेले दिसले. भरत चव्हाण (रा. देव्हारी) याने शुभम सुरडकर याच्या आईला गुरुबहीण मानली असून शुभमची आई मीराबाई बाळू सुरडकर (रा. टिटवी) यांना धनिक फायनान्सने जाळ्यात ओढून कर्ज दिले आहे. १० जून २०२४ रोजी फायनान्सचे वसुली कर्मचारी पंजाब शेषराव थिगळे, सदानंद इंगळे व धीरज शांतम हे टिटवी येथे हप्ता वसुलीसाठी टिटवी गावात आले होते. मीराबाईंनी त्‍यांना हप्ता देण्यास नकार दिला. मीराबाई सुरडकर यांच्या वतीने भरत चव्हाण दर महिन्याला हप्ता भरत असल्याने पंजाब थिगळे याने त्‍यांना हप्ता भरण्यास सांगितले तेव्हा भरत चव्हाण यांनीही सध्या पैसे भरण्यास असमर्थता व्यक्‍त केल्याने फायनान्सवाल्यांनी गावातच त्‍यांची अब्रू काढली. त्‍याआधीही फायनान्सवाल्यांनी असाच मनस्ताप दिल्याने भरत चव्हाण यांनी शुभम सुरडकरला सांगितले, की फायनान्सवाले पैशासाठी त्रास देत असल्याचे सांगितले. आपण गिरडा घाटात त्‍यांना अडवून त्‍यांना फटके देऊ. तू तुझ्या मित्रांना कॉल करून बोलावून घे, असे सांगितले. त्याचवेळी शुभमचा मित्र संजय कांडेलकर (रा. गोतमारा, ता. मोताळा जि. बुलडाणा) याचाही त्याला कॉल आला. तोही शुभमकडे पैशाचे काही जुगाड आहे का, बचतगटाचे पैसे गोळा करणारे गावात आले का, असे विचारले. फायनान्सवाल्यांच्या वाढत्‍या त्रासाचा सोक्षमोक्ष लावण्याचा निर्णय मग शुभमनेही घेतला.

असा रचला कट...
शुभम सुरडकरने त्याचे मित्र संजय प्रभाकर कांडेलकर, मुकेश संजय पवार, किरण अरुण सपकाळ, अमोल प्रकाश जाधव (सर्व रा. गोतमारा ता. मोताळा) यांना फोन करून गिरडा घाट येथे बोलावून घेतले. बचत गटाचे हप्ता गोळा करणारे पंजाब थिगळे (फिर्यादी) व त्याचे सहकारी हे टिटवी गावातून पैसे घेऊन निघाल्यावर त्यांची माहिती देण्याचे काम भरत चव्हाणवर सोपवले. शुभम, संजय, मुकेश, किरण, अमोल हे गिरडा घाटात महादेव मंदिराच्या वरच्या वळणावर थांबले. पंजाब, धीरज, सदानंद हे मोटारसायकलीने टिटवी गावातून निघाल्याची माहिती भरत चव्हाण याने शुभमला दिली. ते गिरडा घाटात येताच शुभम व त्‍याच्या मित्रांनी तिघांना अडवून लोखंडी रॉडने मारहाण करायला सुरुवात केली. त्यांच्याकडील पैसे व मोबाइल काढून घेत त्या ठिकाणाहून पळून गेले. या प्रकरणात सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करून फर्दापूर पोलिसांनी तातडीने सहा जणांना अटक केली. 
फायनान्सवाल्यांची मुजोरी जिरवण्यासाठी वळले गुन्हेगारीकडे! तरुणांनी रस्त्यात अडवून लुटले, बेदम चोपलेही फायनान्सवाल्यांची मुजोरी जिरवण्यासाठी वळले गुन्हेगारीकडे! तरुणांनी रस्त्यात अडवून लुटले, बेदम चोपलेही Reviewed by ANN news network on ६/१२/२०२४ ०८:५१:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".