पुन्हा एकदा शहरातील होर्डिंग्जचे सर्वेक्षण करा
पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरात यापुढे होर्डिंग कोसळून दुर्घटना घडल्यास होर्डिंग मालक. जागा मालक, महापालिकेचे क्षेत्रीय अधिकारी, विभागप्रमुख, स्ट्रक्चरल ऑडिट करणारे कर्मचारी यांना जबाबदार धरण्यात यावे अशी मागणी माजी नगरसेवक मारुती भापकर यांनी महापालिका आयुक्त शेखर सिंह यांच्याकडे केली आहे.
या संदर्भात भापकर यांनी आयुक्तांना निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, १७ एप्रिल २०२३ रोजी किवळे येथे महाकाय अनधिकृत होर्डिंग कोसळून ५ निष्पाप नागरिकांचे बळी गेले होते. त्यानंतर महापालिकेने केलेल्या सर्वेक्षणात शहरात ४०० अनधिकृत होर्डिंग्ज असल्याचे स्पष्ट झाले. महापालिकेने त्या पैकी २०० होर्डिंग्ज ५ पट तडजोडशुल्क आकारून अधिकृत केले. यामुळे महापालिकेला २१ कोटी रुपये मिळाले.
मात्र महापालिकेने वर्षानुवर्षे या अनधिकृत होर्डिंगच्या माध्यमातून कमावण्यात आलेला पैसा वसूल केला नाही. होर्डिंग्जचा गैरव्यवहार प्रशासन आणि होर्डिंग्ज माफियांच्या संगनमताने होतो.त्यामुळे पिंपरी चिंचवड शहरातील अधिकृत अनधिकृत सर्व होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट पुन्हा एकदा व्हावे, सर्वेक्षण व्हावे, अनधिकृत होर्डिंग मालकांकडून त्यांनी बेकायदेशीर कमावलेले सर्व पैसे वसूल करावेत, यापुढे शहरात अशी घटना घडली तर जागामालक, होर्डिंग मालक, क्षेत्रीय अधिकारी, स्ट्रक्चरल ऑडिट करणारे अधिकारी कर्मचारी यांना जबाबदार धरून त्यांच्यावर देखील फौजदारी कारवाई करून त्यांच्याकडून झालेल्या नुकसानीची भरपाई करून घ्यावी.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: