पुणे : पुणे जिल्ह्यातील नारायणगाव येथे दोन दिवसांपूर्वी पुणे ग्रामीण पोलिसांनी एका ३ मजली इमारतीवर छापा घालून महादेव बुक या आंतरराष्ट्रीय बेटिंग अॅपशी संबंधित ७० जणांना अटक केली होती.या शिवाय अन्य काही जणांनाही ताब्यात घेतले होते.
पोलिसांनी या प्रकरणी तब्बल ९९ जणांवर गुन्हा दाखल केला होता. अटक केलेल्यांना न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यापैकी ५ जणांना पोलीस कोठडी दिली असून उर्वरित ८८ जणांना न्यायालयीन कोठडी दिली आहे. त्यांची येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. या प्रकरणात तिघे फरार असून तिघे अल्पवयीन आहेत.
रशीद कमाल शरीफ मुल्ला (वय 28, रा. वजिराबाद, दिल्ली), अजमाद खान सरदार खान (वय 33. रा. दुर्गागंज, लखनऊ, उत्तर प्रदेश), यश राजेंद्रसिंग चौहान (वय 27, रा. नेवसरगोला, गोरखपूर, उत्तरप्रदेश)कुणाल सुनील भट (वय 28, रा. पेठ, जि. जळगाव), समीर युनूस पठाण (वय 25, रा. शुक्रवार पेठ, जुन्नर) अशी पोलीसकोठडी मिळालेल्यांची नावे आहेत.
नारायणगाव येथील व्हिजन गॅलेक्सी सोसायटीतील तीनमजली इमारतीतून कॉलसेंटर स्थापन करून हा अनधिकृत जुगाराचा व्यवसाय चालविला जात होता. पोलिसांनी येथून ४४ संगणक, १८८ मोबाईल्स आणि अन्य साहित्य जप्त केले आहे. विशेष म्हणजे या कॉलसेंटरमध्ये काम करण्यासाठी ऑनलाईन जाहिरात करून, मुलाखती घेऊन कामगार भरण्यात आले होते.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: