संजोग वाघेरे, श्रीरंग बारणे, माधवी जोशी यांना निवडणूक निर्णय अधिकार्‍यांची नोटीस; दैनंदिन खर्च तपासणीत आढळली तफावत

खर्चाचा तपशीलच सादर न करणार्‍या ६ उमेदवारांनाही नोटीसा

पिंपरी : मावळ मतदारसंघातील ६ उमेदवारांना निवडणूक खर्चाचा तपशील सादर न केल्याबद्दल आणि संजोग वाघेरे, श्रीरंग बारणे, माधवी जोशी यांना त्यांनी सादर केलेल्या निवडणूक खर्चाच्या तपशिलात तफावत आढळल्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी दीपक सिंगला यांनी नोटीसा बजावल्या आहेत.

मावळ लोकसभा मतदारसंघ निवडणूकीच्या अनुषंगाने उमेदवारांच्या दैनंदिन खर्चाची पहिली तपासणी आकुर्डी येथील पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, नवीन प्रशासकीय इमारतीमधील मावळ लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात निवडणूक खर्च निरीक्षक सुधांशू राय यांच्या उपस्थितीत तसेच निवडणूक खर्च तपासणी प्रमुख अश्विनी मुसळे आणि सहाय्यक सविता नलावडे यांच्या अधिपत्याखाली पार पडली. 

यावेळी निवडणूकीतील दैनंदिन खर्चाचे लेखे तपासणीकरीता उपलब्ध करून न दिल्याबाबत शिवाजी किसन जाधव, सुहास मनोहर राणे, इन्द्रजीत धर्मराज गोंड, इकबाल इब्राहिम नावडेकर, लक्ष्मण सदाशिव अढाळगे, अजय हनुमंत लोंढे या उमेदवारांना नोटीस बजावण्यात आली आहे. नोटीसमध्ये नमूद केले आहे की, ३३-मावळ लोकसभा सार्वत्रिक निवडणुक २०२४ च्या अनुषंगाने उमेदवाराने किंवा त्यांच्या प्राधिकृत प्रतिनिधीने निश्चित केलेल्या दिवशी निवडणुक खर्चाची नोंदवही व प्रमाणके तपासणीसाठी सादर करणे आवश्यक आहे. लोकसभा निवडणुकीकरिता उमेदवारांचा होणारा रोजचा खर्च निवडणूक खर्च नियंत्रण कक्ष, ३३- मावळ लोकसभा मतदारसंघ, निवडणूक खर्च व्यवस्थापन पथक, ५ वा मजला, अ विंग, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, नविन प्रशासकीय इमारत, आकुर्डी रेल्वे स्टेशन जवळ, आकुर्डी, पुणे येथे दिनांक ३ मे रोजी सकाळी १० ते सांय ५ वाजेपर्यंत सादर करण्याबाबत कळविण्यात आले होते.

सदरची नोंदवही व खर्चाचे प्रमाणके उमेदवार किंवा त्यांच्या प्रतिनिधीने तपासणीसाठी दिनांक ०३ मे रोजी सादर केले नाहीत, त्यामुळे अशा उमेदवारांना नोटीस देण्यात आली आहे. उमेदवारांनी आपला खर्च विहीत दिनांकास सादर केला नसल्याने उमेदवाराने लोकप्रतिनिधीत्व अधिनियम १९५१ च्या कलम ७७ अन्वये खर्चाचे दैनंदिन लेखे ठेवण्यात कसुर केला आहे असे समजण्यात येईल, 

नोटीस प्राप्त झाल्यापासून ४८ तासांच्या आत उमेदवाराने खुलासा सादर करावा व पुढील दुसऱ्या तपासणीवेळी सदर निवडणुक खर्चाचे लेखे ३३ मावळ लोकसभा मतदारसंघ, निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयातील निवडणूक खर्च नियंत्रण कक्ष येथे न चुकता सादर करावा. विहीत मुदतीत खर्च सादर न केल्यास भा. दं. वि. कलम १७१ (१) अन्वये तक्रार दाखल करण्यात येईल तसेच वाहने, सभा इत्यादीसाठी देण्यात आलेल्या सर्व परवानग्या तत्काळ रद्द करण्यात येतील याची नोंद घेण्यात यावी, असेदेखील नोटीसमध्ये नमूद करण्यात आले आहे.  

तर, माधवी नरेश जोशी, संजोग भिकू वाघेरे पाटील आणि श्रीरंग आप्पा चंदू बारणे या उमेदवारांनी निवडणूकीतील दैनंदिन खर्च तपासणीकरीता सादर केला असताना त्यात आढळून आलेल्या तफावतीबाबत निवडणूक निर्णय अधिकारी दीपक सिंगला यांनी त्यांनाही नोटीस बजावली आहे.या नोटीसमध्ये नमूद केले आहे की, ३३-मावळ लोकसभा मतदारसंघ सार्वत्रिक निवडणुक, २०२४ च्या अनुषंगाने उमेदवाराने किंवा त्यांच्या प्राधिकृत प्रतिनिधीने निश्चित केलेल्या दिवशी निवडणुक खर्चाची नोंदवही व प्रमाणके तपासणीसाठी सादर करणे आवश्यक आहे. त्यानुसार दिनांक ०३ रोजी आपले प्राधिकृत प्रतिनिधी मार्फत उमेदवाराचा खर्च निवडणूक खर्च निरीक्षक यांच्याकडे तपासणीसाठी उपलब्ध करुन देण्यात आलेला होता. या खर्चाची तपासणी केली असता निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयाने नोंदविलेल्या शॅडो रजिस्टरसोबत तुलना करता खरा व योग्य वाटत नाही, अथवा खर्चाचा काही भाग समाविष्ठ करण्यात आलेला नाही असे नोटीसमध्ये नमूद करण्यात आले आहे. तसेच निदर्शनास आलेली तफावत़ीची रक्कम देखील नोटीसमध्ये नमूद केली गेली आहे. 

अमान्य तफावतीबाबत सदरची नोटीस प्राप्त झाल्यापासून ४८ तासांच्या आत आपला खुलासा सादर करावा व पुढील दुसऱ्या तपासणीच्या वेळी सदर निवडणूक खर्चाचे लेखे ३३ मावळ लोकसभा मतदारसंघ, निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयातील निवडणूक खर्च नियंत्रण कक्ष येथे न चुकता सादर करावेत. विहीत मुदतीत आपले म्हणणे प्राप्त न झाल्यास नोटीसमधील नमुद खर्च आपणांस मान्य आहे असे गृहीत धरुन आपल्या निवडणुक खर्चामध्ये समाविष्ट करण्यात येईल. नोटीसमध्ये नमुद तफावत आपल्याला मान्य असल्यास सदर खर्चाचा समावेश आपल्या खर्च नोंदवहीत करण्यात यावा व तसे सूचित करण्यात यावे, असे देखील नोटीसमध्ये नमूद करण्यात आले आहे. 

संजोग वाघेरे, श्रीरंग बारणे, माधवी जोशी यांना निवडणूक निर्णय अधिकार्‍यांची नोटीस; दैनंदिन खर्च तपासणीत आढळली तफावत  संजोग वाघेरे, श्रीरंग बारणे, माधवी जोशी यांना निवडणूक निर्णय अधिकार्‍यांची नोटीस; दैनंदिन खर्च तपासणीत आढळली तफावत Reviewed by ANN news network on ५/०५/२०२४ १२:५६:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".