पालघर येथील प्रचार सभेत पुनरुच्चार
मुंबई : पाकव्याप्त काश्मीर हा भारताचा भाग होता, आहे, आणि यापुढेही राहील ही आमची भूमिका असून कोणतीही शक्ती या भूमिकेस आव्हान देऊ शकणार नाही, असा निर्धार केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सोमवारी व्यक्त केला. पालघर मतदारसंघातील भाजपाचे उमेदवार डॉ.हेमंत सावरा यांच्या प्रचार सभेत बोलताना श्री.शाह यांनी काँग्रेस, इंडी आघाडी, राहुल गांधी, शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्ला चढविला. भाजपा प्रणीत एनडीए आघाडी पुन्हा सत्तेवर येणार असून इंडी आघाडीची सर्कस मोदींचा मुकाबला करू शकणार नाही, असा विश्वासही श्री.शाह यांनी व्यक्त केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालघरचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण, डॉ.राजेंद्र गावीत, महेंद्र पाटील, मनोज पाटील, भाजपा प्रदेश सहमुख्य प्रवक्ते विश्वास पाठक आदी यावेळी उपस्थित होते.
दहा वर्षांची यशस्वी कारकीर्द आणि पुढील पंचवीस वर्षांच्या देशाच्या प्रगतीचा स्पष्ट आराखडा असलेल्या भारतीय जनता पार्टीचे नेतृत्व करणारे नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी बसवून देशाची जनता देशाच्या समृद्धीची, विकासाची वाटचाल सुरू ठेवणार आहे, असा विश्वास श्री. शाह यांनी व्यक्त केला. शरद पवार आणि उद्धव ठाकरे हे जनतेला संभ्रमित करणारी वक्तव्ये करत असले, तरी मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवून देशाला समृद्धी मिळवून देणारी निवडणूक आहे हे लक्षात ठेवा असे आवाहन त्यांनी पालघरवासीयांशी संवाद साधताना केले.
या सभेत बोलताना श्री.शाह यांनी मोदी सरकारच्या दहा वर्षांच्या यशस्वी कारकिर्दीचा संपूर्ण आलेखच जनतेसमोर मांडला. इंडी आघाडीकडे नेता नाही, सत्ता मिळाल्यास पंतप्रधान कोण होणार हे त्यांनाच माहीत नाही. त्यामुळे आळीपाळीने पंतप्रधानपदावर बसण्याचा त्यांचा इरादा आहे. आळीपाळीने देशाचे नेतृत्व करणारी व्यक्ती देशाचे नेतृत्व कसे करणार, कोणत्याही संकटातून देशाला कसे वाचविणार, देशाचा विकास कसा करणार, असा सवाल करून श्री.शाह म्हणाले, विकास आणि जनतेची सुरक्षा यांची हमी केवळ मोदी हेच देऊ शकतात. ही निवडणूक महत्वपूर्ण आहे. देश कोणाच्या हाती सुरक्षित, समृद्ध राहणार याचा निर्णय जनतेला करावयाचा आहे. एका बाजूला 12 लाख कोटींचे घोटाळे करणारे काँग्रेस व इंडी आघाडी, आणि दुसऱ्या बाजूला आपल्या उभ्या कारकिर्दीत भ्रष्टाचाराचा एकही आरोप नसलेले नरेंद्र मोदी यांच्यातील ही लढाई आहे, असे श्री.शाह म्हणाले.
हेमंत सावरा यांना दिले जाणारे एक-एक मत नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी मोलाचे ठरणार आहे. मोदींनी देशाला सुरक्षित बनविले, समृद्ध बनविले, देशाची प्रतिष्ठा जगात उंचावली आहे. काँग्रेस, शरद पवार आणि इंडी आघाडीतील अनेक घटक पक्षांनी 70 वर्षे अयोध्येतील राम मंदिरात अडथळेच आणले. मोदींनी पाच वर्षांतच राम मंदिराची न्यायालयीन लढाई जिंकली, मंदिर बांधले, आणि श्रीरामाची प्राणप्रतिष्ठाही केली. या समारंभाचे निमंत्रणही या आघाडीच्या नेत्यांनी झिडकारले, आणि बहिष्कार घातला. राहुल गांधी, उद्धव ठाकरे यांनी प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रण नाकारले, कारण या सोहळ्यास हजेरी लावली तर व्होट बँक नाराज होईल, याची त्यांना भीती होती. मोदी यांनी 370 कलम रद्द करून काश्मीरला देशाच्या मुख्य प्रवाहात सामील करून घेतले. मोदी सरकारने नक्षलवाद, दहशतवाद नष्ट करून देशाला सुरक्षित बनविले. 80 कोटी गरीबांना मोफत धान्य देऊन त्यांच्या जीवनात आनंद आणून त्यांची जीवनशैली उंचावण्याचे काम केले. घराघरांत गॅस दिला, ज्येष्ठ नागरिकांसाठी पाच लाखांपर्यंतचे वैद्यकीय उपचार मोफत केले, कोविडकाळात लस निर्माण करून मोदींनी 130 कोटी लोकसंख्येला सुरक्षित केले. राहुल गांधी देशाला सुरक्षित, समृद्ध करू शकतील का, असा सवाल करून, हे तर केवळ कुटुंबाच्या विकासासाठी एकत्र आले आहेत, असा आरोपही त्यांनी केला.
राम मंदिर, कलम 370, तिहेरी तलाक, याबाबत उद्धव ठाकरे बोलणार नाहीत, कारण ते काँग्रेस, शऱद पवारांच्या मांडीला मांडी लावून बसले आहेत, असेही श्री.शाह म्हणाले. पदाच्या लालसेने दहशतवादी कसाबचे समर्थन करणाऱ्या लोकांसोबत जाताना उद्धव ठाकरे यांना लाज वाटत नाही का, असा सवाल त्यांनी केला. राहुल गांधींनी वीर सावरकरांना विरोध केला, इंडी आघाडीचे नेते सनातन धर्माचा विरोध करतात, उद्धव ठाकरे यांना हे मान्य आहे का, हे त्यांनी महाराष्ट्राच्या जनतेसमोर स्पष्ट करावे, असे आव्हानही त्यांनी दिले. खऱी शिवसेना कोण आणि नकली शिवसेना कोण हे आता जनताच उद्धव ठाकरेंना दाखवून देईल, असेही ते म्हणाले. मोदीजींना पंतप्रधान बनविणे म्हणजे, पाकिस्तानला मुहतोड जबाब देणे, देशातील कोट्यवधी युवकांना जगासोबत जोडणे, देशाची अर्थव्यवस्था तिसऱ्या क्रमांकावर नेऊन ठेवणे आहे, असेही ते म्हणाले. मोदी सरकारने आदिवासी विकासाच्या कामांना वेग दिला, आदिवासी कल्याण योजना आखल्या, एक लाख 25 हजार कोटींच्या योजनांना गती दिली, एकलव्य विद्यालये निर्माण केली, आणि आदिवासी समाजाच्या विकासाचा मार्ग आखला, असे ते म्हणाले. आपल्या जीवनाचा प्रत्येक क्षण देशसेवेसाठी समर्पित करणारे मोदी एका बाजूला, तर आपल्या वारसांना राजकारणात मुख्यमंत्री बनविण्याच्या एकमात्र उद्देशाने एकत्र आलेले इंडी आघाडीचे नेते जनतेचे कल्याण कसे करणार, असा सवाल त्यांनी केला. उद्धव ठाकरे त्यांच्या मुलाला, शरद पवार त्यांच्या कन्येला मुख्यमंत्री बनविण्यासाठी तर सोनिया गांधी राहुल गांधींना पंतप्रधान बनविण्यासाठी राजकारण करत आहेत, असा आरोपही त्यांनी केला.
महाराष्ट्राला देशात पहिल्या क्रमांकाचे स्थान प्राप्त करून देण्याची कामगिरी देवेंद्र फडणवीस आणि महायुती सरकारने बजावली आहे, असे सांगून त्यांनी महाराष्ट्रातील विकास कामांची यादीच जनतेसमोर सादर केली. केवळ भारतीय जनता पार्टी आणि नरेंद्र मोदी हेच देशाला आणि महाराष्ट्राला पुढे नेण्याचे काम करतील, अशी ग्वाही देत, हेमंत सावरा यांना विजयी करण्याचे आवाहन श्री.शाह यांनी केले. सावरा यांना विजयी करा, तुमच्या मतदारसंघाला सर्व क्षेत्रांत आघाडीवर नेण्याचे काम नरेंद्र मोदी करतील, असा विश्वासही श्री.शाह यांनी भाषणाच्या अखेरीस व्यक्त केला. पालघर परिसरात सूर्या धरणाचे पाणी देऊन वसई, पालघरवासीयांची तहान भागविणारी योजना महायुती सरकारने आखली आहे, असे त्यांनी सांगितले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: